Hathras Gangrape: ‘हाथरस’चा तपास सीबीआयकडे; योगी सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 05:10 AM2020-10-04T05:10:27+5:302020-10-04T06:53:36+5:30
Hathras Gangrape case CBI Probe: कुटुंबीयांकडून मात्र न्यायालयीन चौकशीची मागणी
हाथरस : उत्तर प्रदेश पोलिसांवर अथवा सीबीआयवर आमचा विश्वास नसून, आमच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिचा मृत्यू यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी केली. त्यानंतर काही मिनिटांतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा केली.
मृत मुलीच्या कुटुंबीयांनी कधीही सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती. किंबहुना आम्हाला सीबीआय तपास नको, आमचा त्या यंत्रणेवर विश्वास नाही, असे कुटुंबातील प्रत्येक जाण सांगत होता. तरीही सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला आहे.
दरम्यान, शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. प्रियांका यांनी मुलीच्या आईला आलिंगन दिले, तेव्हा सर्वच जण भावुक झाले. हे दोन्ही नेते सुमारे एक तास कुटुंबियांसमवेत होते.
येथील सरकारी यंत्रणेकडून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, त्रास दिला जात आहे. आमचा उत्तर प्रदेश पोलिसांवर आणि सीबीआयवर अजिबात विश्वास नाही, असे मृत पीडितेच्या आईने प्रियांका यांना सांगितले. मुलीवरील अत्याचारांची न्यायालयीन चौकशीच व्हायला हवी, असे आईने सांगितल्याची माहिती प्रियांका गांधी यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.
राहुल व प्रियांका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब हटविण्यात यावे, अशी या कुटुंबीयांची मागणी आहे. जिल्हाधिकारी आम्हाला धमकावत आहेत, असे कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले आहे. आम्ही कुटुंबियांचे सांत्वन करायला आलो आहोत, या प्रश्नाचे आम्हाला राजकीय भांडवल करायचे नाही, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. सरकारने या कुटुंबाचे रक्षण करावे, अशी मागणीही राहुल यांनी केली.
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला हवी ती मदत आन्ही करू, असे राहुल आणि प्रियंका यांनी कुटुंबीयांना सांगितले. प्रियांका गांधी म्हणाल्या की महिलांवर होणाºया अत्याचाराविरोधात आपण कायमच उभे राहू. अत्याचाराविरोधात देशभर फिरू. इथे दलितांवर आधी काही तरुणांनी अत्याचार केला आणि आता सरकारी यंत्रणा घरच्यांना त्रास देत आहे.
न्यायालयात याचिका करणार?
या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे मुलीच्या भावाने सांगितले. आम्हाला सीबीआय तपास नकोच आहे, असे मृत मुलीच्या वहिनीने सांगितले. कदाचित तशी याचिका कुटुंबीय वा अन्य कोणामार्फत सर्वोच्च न्यायालयात केली जाण्याची शक्यता आहे.
राहुल आणि प्रियांका गांधी यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाला भेट दिली. तासभर चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसतर्फे या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश दिला. त्यावर किती रक्कम लिहिली आहे, हे आपण अद्याप पाहिलेले नाही, असे मुलीच्या भावाने पत्रकारांना सांगितले.
तिसऱ्या दिवशी भेटीची परवानगी
या कुटुंबीयांना भेट देण्याच्या प्रयत्न राहुल आणि प्रियांका गांधी यांनी गुरुवारीच केला होता. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी याला अटकाव करीत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्कीही करण्यात आली.
शुक्रवारीही तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह आलेल्या अन्य महिला खासदारांनाही हाथरसमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. पोलिसांनी ओब्रायन यांच्याशीही धक्काबुक्की केली.
शनिवारीही राहुल, प्रियांका व काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्त्यांसह नवी दिल्लीतून हाथरसच्या दिशेने निघाले. शशी थरुर यांच्यासह ३० खासदार सोबत होते. कोणाही प्रवेश करू नये यासाठी २०० हून अधिक पोलिसांना तैैनात होते. यामुळे तिथे छावणीचे स्वरुप आले होते. अखेर पोलिसांनी दुपारी काँग्रेसच्या ताफा अडवला व कार्यकर्त्यांवर लाठीमारही केला.
यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाल्याने अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पाच जणांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्योबत के. सी. वेणुगोपाल व अधिररंजन चौधरी यांना जाण्याची परवानगी देण्यात आली.