Hathras News: हातरसच्या भोले बाबांचा 13 एकरात 5 स्टार आश्रम, इतक्या कोटींची आहे मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:22 AM2024-07-04T09:22:41+5:302024-07-04T09:23:29+5:30
Hathras News: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बाबांचा 13 एकरात आश्रम आहे, याची किंमत 4 कोटी रुपये आहे. कागदपत्रावरुन ही माहिती समोर आली आहे.
Hathras News: दोन दिवसापूर्वी हाथरसमध्ये सत्संगवेळी मोठी दुर्घटना घडली, चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा मृत्यू झाला. याबाबत आता आणखी एक माहिती समोर आली आहे. हातरस घटनेचा मुख्य चेहरा नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांच्या मालमत्तेबाबतही मोठा खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा एक आलिशान आश्रमही अनेक एकरांमध्ये असल्याची माहिती आहे, याची किंमत कोटींमध्ये आहे. विशेष म्हणजे चेंगराचेंगरीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये बाबांचे नाव कुठेही आलेले नाही. या आश्रमात त्यांचे वास्तव्य होते असे बोलले जाते. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे बाबांच्या संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रे मिळाली आहेत. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बाबाचा १३ एकरात पसरलेला आश्रम असून त्याची किंमत ४ कोटी रुपये आहे. या आश्रमात अनेक खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये 5 स्टार हॉटेल्ससारख्या सुविधाही आहेत. या आश्रमात सूरज पाल राहत होते आणि ६ खोल्या फक्त त्यांच्यासाठीच होत्या. इतर ६ खोल्या समिती सदस्य आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे आश्रमात जाण्यासाठी एक खासगी रस्ता होता आणि त्यात अत्याधुनिक उपहारगृहाचाही समावेश आहे.
अहवालानुसार, 'तीन-चार वर्षांपूर्वी आश्रमाची जमीन भेट म्हणून देण्यात आली होती, बाबांनी दावा केला. परंतु कागदपत्रांवरून असे दिसून आले की त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या इतर अनेक मालमत्ता आहेत आणि ते देशाच्या अनेक भागात आहेत.
८० हजार लोकांसाठी परवानगी
मंगळवारी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ७ मुलांचाही समावेश आहे. पाल यांनी आयोजित केलेल्या सत्संगादरम्यान ही घटना घडली. रिपोर्टनुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की केवळ ८० हजार लोकांसाठी परवानगी देण्यात आली होती, परंतु २.५० लाख लोक कार्यक्रमाला पोहोचले होते. पाल आपल्या कारमधून परतत असताना माती घेण्यासाठी गर्दी झाली.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पाल यांच्या अनेक लोकांनी लोकांना मागे ढकलण्यास सुरुवात केली, त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि जमावाने त्यांना चिरडले. पाल यांच्यावर आग्रा, इटावा, कासगंज, फारुखाबाद आणि राजस्थानमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.