हाथरस बलात्कारप्रकरणी महिला आयोगाने मागविले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:02 AM2020-10-01T03:02:42+5:302020-10-01T03:03:23+5:30
संतापाची लाट : लखनऊमध्ये निदर्शने; मोदींनी केली मुख्यमंत्री योगींशी फोनवर चर्चा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर सवर्णांनी केलेल्या बलात्काराच्या भीषण घटनेची कसून चौकशी करण्यात यावी व दोषींना अत्यंत कठोर शिक्षा करावी, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुधवारी दिले आहेत.
हाथरसमधील बलात्कार प्रकरणाबाबत मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविण्यात येईल. दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांनी तिची जीभ कापली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, या संघटनेचे दिल्ली विभागाचे प्रमुख हिमांशू वाल्मीकी हे हाथरसला निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते व आता दोघेही बेपत्ता आहेत, असा आरोप चंद्रशेखर आझाद यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हाथरस, लखनऊ येथे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी जोरदार निदर्शने केली.
योगींनी राजीनामा द्यावा : प्रियांका गांधी
काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, या बलात्कारपीडित मुलीचा मृत्यू झाला याची बातमी तिच्या वडिलांना कळविण्यात आली, त्यावेळी नेमकी मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते. ही मुलगी व तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यायचे सोडून योगी सरकारने त्यांच्या मानवी हक्कांवरच गदा आणण्याचे काम केले आहे. योगी यांनी राजीनामा द्यावा.
मायावती म्हणाल्या, नातेवाईकांना अंत्यसंस्कार करू न देता हे विधी पोलिसांनीच परस्पर उरकले हे चुकीचे वर्तन आहे.
अखिलेश यादव म्हणाले, मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले, कारण त्यांना सर्व पुरावे नष्ट करायचे होते.
कंगना रनौत म्हणाली, हैदराबादमधील मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना ज्या जागी गोळ्या घालून ठार मारले, तसाच न्याय हवा.
पहिल्यांदा काही हैवानांनी बलात्कार केला. त्यानंतर साºया यंत्रणेने तेच कृत्य केले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.