Hathras Stampede : "मी सत्संगला जाण्यापासून रोखलं पण..."; चेंगराचेंगरीत कुटुंब उद्ध्वस्त, काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:44 AM2024-07-03T09:44:30+5:302024-07-03T09:59:02+5:30
Hathras Stampede : हाथरस जिल्ह्यात आयोजित सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात आयोजित सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. हाथरसच्या सिकंदरमऊ भागात सत्संग होत होता, ज्यामध्ये शेजारील जिल्ह्यातील लोकही सहभागी होण्यासाठी आले होते. या चेंगराचेंगरीत बहुतांश महिलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरून आणि चिरडल्याने झाला आहे. हाथरस दुर्घटनेत कोणी आपली आई गमावली तर कोणी आपली मुलगी गमावली.
कुटुंबीय गमावल्याचे दु:ख लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. चेंगराचेंगरीत कमला नावाच्या महिलेच्या १६ वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला. कमला म्हणाल्या, "मी २० वर्षांपासून बाबांच्या सत्संगाला येत आहे. मी माझ्या १६ वर्षांच्या मुलीसह सत्संगाला गेले होते आणि दुपारी २ वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. मला आणि माझ्या मुलीला किरकोळ दुखापत झाली. ती बरी होती पण रुग्णालयात पोहोचल्यावर बेशुद्ध पडली, नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले."
संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले
या दुर्घटनेत अनेकांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, विनोदची अवस्थाही अशीच आहे. चेंगराचेंगरीत विनोदची पत्नी, आई आणि मुलीचा मृत्यू झाला. विनोदने रडत-रडत एएनआयला सांगितलं की, "या तिघी सत्संगाला गेल्या होत्या हे मला माहीत नव्हतं, कारण मी बाहेर गेलो होतो. मला कोणीतरी सांगितलं की सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, त्यानंतर मी घटनास्थळी पोहोचलो. माझी मुलगी, आई आणि पत्नी मृत झाल्याची माहिती मिळाली. मात्र मला माझ्या आईचा मृतदेह सापडला नाही."
"अजूनही आई सापडली नाही"
चेंगराचेंगरीत एका ३.५ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. मुलाचे काका कुंवर पाल म्हणाले, "मुलगा आपल्या आईसोबत येथे आला होता. त्याची आई अद्याप बेपत्ता आहे. आम्ही अलीगडचे रहिवासी आहोत." अपघातात जखमी झालेल्या एकाचे कुटुंबीय, हीरा लाल हे अलीगडहून येथे आले होते. हीरा लाल म्हणाले, "माझे संपूर्ण कुटुंब सत्संगात सहभागी होण्यासाठी येथे बसने आले होते. चेंगराचेंगरीत माझ्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत."
"सत्संगाला जाण्यापासून अनेक वेळा रोखलं"
महताब यांची पत्नी गुडिया देवी बाबांच्या सत्संगात सहभागी होण्यासाठी आली होती. महताब यांनी रडत रडत आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, "मी तिला बाबांच्या सत्संगाला जाण्यापासून अनेक वेळा रोखलं. पण ती तयार झाली नाही. ती आमच्या मुलीसह आणि शेजारच्या दोन महिलांसोबत सत्संगासाठी आली होती. या घटनेत शेजारच्या महिला आणि माझी पत्नी यांचा मृत्यू झाला आहे. माझी मुलगी सुरक्षित आहे."