Hathras Stampede :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 09:26 AM2024-07-13T09:26:56+5:302024-07-13T09:34:00+5:30
Hathras Stampede : हाथरस येथे भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
२ जुलै रोजी हाथरस येथे भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून आजतागायत बाबा एकदाही समोर आले नाहीत. याच दरम्यान भोले बाबांचे वकील ए के सिंह यांनी 'आज तक'वर दावा केला आहे की, बाबा कुठेही लपलेले नाहीत. या घटनेने बाबा खूप दुखावले आहेत. यानंतर भोले बाबांच्या वतीने पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दावा करण्यात आला.
भोले बाबांच्या या दाव्यांचा तपास करण्यासाठी, आज तकच्या टीमने हाथरस, एटा, जालेसर येथे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या पीडित कुटुंबांच्या घरांना भेट दिली. भोले बाबांनी लोकांना मदत केल्याच्या सर्व दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बाबांकडून त्यांच्या घरी काही मदत आली का? बाबांच्या समितीने त्यांच्याशी संपर्कही केला का? या सर्व प्रकाराबाबत लोकांनी माहिती दिली आहे.
हाथरस घटनेत ६५ वर्षीय चंद्रप्रभा यांना गमावलेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी टीम सर्वप्रथम एटाला पोहोचली. येथे राम दास यांनी सांगितलं की, भोले बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, परंतु आजनंतर ते बाबांच्या कोणत्याही सत्संगाला जाणार नाही आणि त्यांचं कधीही ऐकणार नाहीत.
जलेसर राज कुमार यांच्या घरी टीम पोहोचली. राजकुमार मजुरीचे काम करतो आणि बाबांची पूजाही करतो. तो पत्नी आणि १७ वर्षांची मुलगी खुशबूसोबत सत्संगाला आला होता. पण सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आजपर्यंत बाबांकडून कोणतीही मदत किंवा आश्वासन मिळालेलं नाही. मात्र, सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत मिळत आहे.
एका कुटुंबाची अवस्थाही बिकट असून रडत आहे. इथे एकाच घरातील दोन मुली बाबांच्या सत्संगाला गेल्या होत्या, पण त्या परतल्याच नाहीत. मीरा आणि सुधा अशी मुलींची नावं होती. आज तकशी बोलताना त्यांच्या आईने सांगितलं की, बाबांच्या बाजूने कोणतीही मदत आली नाही, माझ्या दोन्ही मुली गेल्या. सरकारकडून मदत आली आहे, पण बाबांच्या बाजूने कोणीही आलं नाही.
हाथरसमध्ये आता बाबांना देव मानणारे भक्त आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर बाबांना ढोंगी म्हणू लागले आहेत. ज्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, "दहा दिवस झाले, ना बाबा आले ना त्यांचं कोणी आलं. बाबा ढोंगी आहेत. बाबा काही चमत्कार करत नाहीत." आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.