Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 10:11 AM2024-07-08T10:11:21+5:302024-07-08T10:27:38+5:30
Hathras Stampede : हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीबाबत भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी मोठा दावा केला आहे. या दुर्घटनेमागे नवीन थेरी मांडताना ते म्हणाले की, "काही लोकांकडे विषारी स्प्रे होता. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच चेंगराचेंगरी होऊन अनेकांना जीव गमवावा लागला. या प्रकरणात बाबांच्या सत्संगाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे."
रविवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भोले बाबांचे वकील एपी सिंह यांनी आरोप केला की, भोले बाबांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन ही संपूर्ण घटना एका षड्यंत्राचा भाग म्हणून घडवून आणण्यात आली आहे. "२ जुलै रोजी हाथरस सत्संगाच्या वेळी काही लोकांनी गर्दीत विषारी पदार्थ असलेले कॅन उघडले, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली."
"१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन सत्संगात आले होते. ते विषारी स्प्रे मारून पळून गेले आणि हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं दिसतं. हे सर्व लोक गाडीतून पळून गेले. अनेक लोक त्यात बेशुद्ध पडले, मी विशेष तपास पथकाला (एसआयटी) विनंती करतो की, या घटनेमागे कोण आहेत याचा तपास करा. घटनेपूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावेत, तरच सूत्रधारांचा शोध लागेल. ही दुर्घटना नाही तर हत्या आहे" असं वकिलाने म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सूरजपाल उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये १२१ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश महिला होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला अटक केली आहे. याशिवाय आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी सत्संग आयोजन समितीचे सदस्य होते.