Hathras stampede: हाथरस अपघातात पोलिसांची मोठी कारवाई, २० जणांना अटक, मुख्य सेवेकरीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:48 AM2024-07-04T11:48:53+5:302024-07-04T11:50:17+5:30
Hathras stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेत पोलिसांनी मोठी कारवाई करत २० जणांना अटक केली.
Hathras stampede :उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची पोलीस चौकशी करत आहेत. हातरस पोलिसांनी ७ पथके तयार केली. मुख्य सेवेदार देवप्रकाश मधुकर यांचा शोध सुरू आहे. योगी सरकारने या संपूर्ण प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, गृह विभागाने बुधवारी सायंकाळी उशिरा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती ब्रजेश कुमार श्रीवास्तव द्वितीय यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली. आयोगाचे मुख्यालय लखनौ येथे असेल. आयोगाला दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करावी लागणार आहे.
Hathras News: हातरसच्या भोले बाबांचा 13 एकरात 5 स्टार आश्रम, इतक्या कोटींची आहे मालमत्ता
निवृत्त आयएएस हेमंत राव, ते अतिरिक्त मुख्य सचिव होते, आणि डीजी प्रोसिक्युशन आणि सेवानिवृत्त आयपीएस भावेश कुमार मुख्य राज्य माहिती आयुक्त होते, यांना आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. हातरस येथे २ जुलै रोजी झालेल्या घटनेची चौकशी आयोगाकडे सोपवण्यात आली आहे. आयोजकांनी परवानगी देताना घातलेल्या अटींचे पालन केले की नाही, याची चौकशी आयोग करेल. हा अपघात आहे की नियोजित कट आहे हेही आयोग पाहणार आहे. प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची चौकशी करण्याची जबाबदारीही आयोगाला देण्यात आली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजनाही आयोग सुचवणार आहे.
भोले बाबांचा 13 एकरात 5 स्टार आश्रम
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे बाबांच्या संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रे मिळाली आहेत. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बाबाचा १३ एकरात पसरलेला आश्रम असून त्याची किंमत ४ कोटी रुपये आहे. या आश्रमात अनेक खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये 5 स्टार हॉटेल्ससारख्या सुविधाही आहेत. या आश्रमात सूरज पाल राहत होते आणि ६ खोल्या फक्त त्यांच्यासाठीच होत्या. इतर ६ खोल्या समिती सदस्य आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे आश्रमात जाण्यासाठी एक खासगी रस्ता होता आणि त्यात अत्याधुनिक उपहारगृहाचाही समावेश आहे.
अहवालानुसार, 'तीन-चार वर्षांपूर्वी आश्रमाची जमीन भेट म्हणून देण्यात आली होती, बाबांनी दावा केला. परंतु कागदपत्रांवरून असे दिसून आले की त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या इतर अनेक मालमत्ता आहेत आणि ते देशाच्या अनेक भागात आहेत.