Hathras Gangrape : "पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करताहेत, गरीब असल्याने फसवण्याचा प्रयत्न", पीडितेच्या भावाचा आरोप

By सायली शिर्के | Published: October 8, 2020 09:41 AM2020-10-08T09:41:03+5:302020-10-08T09:53:59+5:30

Hathras Gangrape : पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल 104 वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. यानंतर आता पोलीस माझ्या बहिणीचे चारित्र्यहनन करत आहेत असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. 

hathras victim brother says police is engaging in character assassination | Hathras Gangrape : "पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करताहेत, गरीब असल्याने फसवण्याचा प्रयत्न", पीडितेच्या भावाचा आरोप

Hathras Gangrape : "पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करताहेत, गरीब असल्याने फसवण्याचा प्रयत्न", पीडितेच्या भावाचा आरोप

Next

नवी दिल्ली - हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात आता रोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल 104 वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेशपोलिसांनी केला आहे. यानंतर आता पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करत आहेत असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. 

पीडितेच्या मोठ्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, "हा आमच्याविरोधात रचलेला कट आहे. मारेकरी अतिशय चलाख आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतात. 10 वर्षांपूर्वी आपण वडिलांसाठी एक सिम विकत घेतलं होतं मात्र त्यांचा फोन नेहमी हरवायचा. यासाठी आपण आपल्या आयडीने सिम विकत घेतलं. हा फोन नेहमीच घरीच असतो. गावातील सर्वांकडे, इतकेच काय पण ग्रामप्रमुखांकडेदेखील आमचा हा एकच नंबर आहे. या फोनचा उपयोग अधिकतर वडीलच करतात. मात्र मुख्य आरोपी संदीपशी कधीही संपर्क केला नाही."

"पोलीस माझ्या बहिणीचे चारित्र्यहनन करताहेत"

पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडितेच्या मोठ्या भावाने केला आहे. आम्ही नेहमीच बहिणीवर नजर ठेवून असायचो. मला माझ्या बहिणीवर कोणताही संशय नाही असं देखील म्हटलं आहे. तसेच माझी बहीण शिकलेली नव्हती. तिला फोन नंबर देखील डायल करता येत नव्हता. तिला फोन उचलता देखील यायचा नाही अशी माहिती पीडितेच्या छोट्या भावाने दिली आहे. पीडितेचा छोटा भाऊ गाझियाबाद येथे काम करतो. त्याने पोलिसांच्या या दाव्याबाबत पुराव्याची मागणी केली आहे. 

"गरीब असल्याने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न"

"उत्तर प्रदेश पोलीस आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आम्ही गरीब आहोत. आमच्यावरील अत्याचाराला शेवट नाही. जर त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, तर मग पुरावे देखील असतीलच. मला ती कॉल रेकॉर्डिंग ऐकायची आहे" असं भावाने म्हटलं आहे. कॉल डीटेल रेकॉर्ड (CDR) डाक्युमेंट्समध्ये एकच नंबरची वेळ, कालावधी, लोकेशन आणि कॉलची संख्या नमूद आहे. या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी आणि पीडित कुटुंबाचा कॉल रेकॉर्ड तपासला तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्यावर्षी 13 ऑक्टोबरपासून सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. तसेच यापैकी बहुतांश कॉल हे चंदपा येथून करण्यात आले असे दिसून आले. या परिसर पीडितेच्या गावापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे.

पीडितेचं कुटुंब आणि आरोपींमध्ये नियमितपणे संभाषण

कॉल डिटेल्सनुसार, 62 कॉल हे पीडित कुटुंबाकडून करण्यात आले. तर 42 कॉल हे आरोपी संदीपकडून करण्यात आले. पीडितेचं कुटुंब आणि आरोपींमध्ये नियमितपणे संभाषण होत असल्याचे यूपी पोलिसांच्या तपासात दिसून आले. आरोपी संदीपला पीडितेच्या भावाने कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. यादरम्यान, या प्रकरणी एसआयटीचा तपाससुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे. आता एसआयटी आपला तपास अहवाल बुधवारी योगी आदित्यनाथ यांना सुपूर्द करतील अशी शक्यता आहे. गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली डीआयजी चंद्रप्रकाश आणि एसपी पूनम हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हाथरसमध्ये पीडितेच्या गावातील सर्वांची झाली कोरोना चाचणी

हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार पीडितेच्या गावातील सर्व लोकांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी येथे काही पत्रकार आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हाथरसमध्ये सतत राजकीय पक्षांचे नेते आणि पत्रकारांची ये-जा सुरू होती. हे पाहता गावातील लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याचा विचार करूनच ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील सर्व सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. पीडितेच्या गावातील लोकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट 24 तासांत येण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

हाथरसमधील एका तरुणीवर 14 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच पीडित युवतीची आरोपींनी जीभही कापल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच पीडितेच्या मणक्याचे हाडही मोडले होते. क्रूरपणे बलात्कार झालेल्या तरुणीला उपचारांसाठी प्रथम अलीगडमधील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तिला अधिक उपचारांसाठी दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र तिथे उपचारांदरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडितेवर घाईगडबडीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उत्तर प्रदेशचे सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे. पीडित तरुणीवर पोलिसांनी जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

Read in English

Web Title: hathras victim brother says police is engaging in character assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.