‘न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:21 AM2017-08-16T04:21:59+5:302017-08-16T04:22:04+5:30
देशातील न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास असून, न्यायालयात संविधानातील कलम ३५एला आव्हान देणारी याचिका रद्दबातल होईल
श्रीनगर : देशातील न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास असून, न्यायालयात संविधानातील कलम ३५एला आव्हान देणारी याचिका रद्दबातल होईल, असा आशावाद जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी येथे बोलून दाखविला. त्या येथील बख्शी स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या स्वतंत्रता दिन समारोह कार्यक्रमात बोलत होत्या.
जम्मू-काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाला जर कुठे धोका निर्माण झाला तर सत्तेचा लढाई वा राजनैतिक विचारधारा बाधक ठरणार नाही, असे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर त्यांनी विरोधी पक्ष नॅशनल काँग्रेस नेते फारूक अब्दुल्ला यांचा पितृतूल्य सल्ल्याचे पालन केले आहे.
आम्हाला देशातील प्रत्येक संस्थानावर पूर्णपणे विश्वास आहे. काही लोकांनी आम्हाला पुन्हा १९४७ साली नेण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही जण उच्च न्यायालयात गेले. परंतु, आमचा उच्च न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे. यापूर्वीही न्यायालयाने जम्मू-काश्मीरच्या विशेष दर्जाला आव्हान देणारी याचिका खारिज केली आहे, असे त्या म्हणाल्या.
राज्यातील नागरिकांनी आपण विकासाच्या दिशेने जात आहोत का? आपण गेल्या ७० वर्षांमध्ये काय प्राप्त केले, याचे अवलोकन केले पाहिजे. देशातील अनेक राज्यांनी मोठी प्रगती केली; पण जम्मू-काश्मीर अजूनही मूलभूत गरजा आणि दहशतवादामध्ये गुरफटला आहे, असे मुफ्ती यांनी सांगितले.