दविंदर सिंगविरोधात पुरेसा पुरावा-राष्ट्रीय तपास संस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:36 AM2020-06-20T02:36:13+5:302020-06-20T02:36:21+5:30
दहशतवाद्यांना मदतीचे प्रकरण : लवकरच आरोपपत्र दाखल होणार
नवी दिल्ली : दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले जम्मू आणि काश्मीरचे उपपोलीस अधीक्षक दविंदर सिंग यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा असल्यामुळे लवकरच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल, असे राष्ट्रीय तपासणी संस्थेने (एनआयए) शुक्रवारी म्हटले.
एनआयएच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले की, एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्यात दविंदर सिंग हे न्यायालयीन कोठडीत आहेत. आमच्याकडे त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा आहे आणि योग्य वेळेत त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले जाईल. काश्मीरमधून दोन दहशतवाद्यांना बाहेर घेऊन जाताना दविंदर सिंग यांना ११ जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरमध्ये पकडण्यात आले होते. एनआयएने हे प्रकरण १८ जानेवारी रोजी आपल्या ताब्यात घेतले होते.