थोडा संयम बाळगा, चीनने भारताला दिला इशारा
By admin | Published: May 30, 2017 10:12 AM2017-05-30T10:12:00+5:302017-05-30T10:12:00+5:30
भारताने आसाम आणि अरुणाचल प्रदेश या देशातील दोन राज्यांना जोडणारा पूल उभारल्यानंतर चीनने लगेच विरोध केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - भारताने आसाम आणि अरुणाचल प्रदेश या देशातील दोन राज्यांना जोडणारा पूल उभारल्यानंतर चीनने लगेच विरोध केला आहे. अरुणाचलमध्ये बांधकाम करताना भारताने सावधता आणि आत्मसंयम बाळगावा असे चीनने म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. पण भारताने नेहमीच चीनचा हा दावा खोडून काढताना अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग असल्याचे चीनला निक्षून सांगितले आहे.
भारत आणि चीनमध्ये सीमावाद अजून मिटलेला नाही. तो पर्यंत सीमावर्ती भागात शांतत राखण्यासाठी भारताने आत्मसंयमाची भूमिका घ्यावी असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयएएनएस वृत्तसंस्थेला म्हटले आहे. सरकारच्या तिस-या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मागच्या आठवडयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील लोहित नदीवर बांधण्यात आलेला देशातील सर्वांत लांब पूल (९.१५ किलोमीटर) राष्ट्राला अर्पण केला. या पुलामुळे १६५ किलोमीटरचे अंतर घटले असून, ७ ते ८ तासांचा प्रवासही वाचला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाची दारे उघडली जातील.
वांद्रे-वरळी सी लिंक पुलापेक्षा हा पूल ३.५५ किलोमीटरने लांब असून, पुलासाठी २,०५६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. लोहित नदीवरील पुलामुळे नव्या आर्थिक क्रांतीचा पाया घातला जाईल व आर्थिक महासत्ता बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. या पूलामुळे दिवसाला 10 लाख रुपयांचं इंधन वाचेल असा दावा सरकार करतं आहे. चीन सीमेवर तातडीनं हालचाली करण्यासाठी, अवजड टँक आणि इतर शस्रांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी हा पूल फायद्याचा ठरणार आहे.
या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी तुकडीला आसामच्या ढोलामधून अरुणाचलला जायचं असलं की नौकेतून प्रवास करण्यासाठी तासनतास घालवावे लागत. सोबत अवजड वाहन असल्यास 250 किमी वळसा घालत 10 तासांचा प्रवास करावा लागायचा. पण या पूलामुळे पूर्वोत्तर सीमेवर लष्कराला अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.
पुलाची वैशिष्ट्यं
- ढोला-सदिया ब्रम्हपुत्र पुलाची लांबी 9.15 किलोमीटर आहे.
- ब्रम्हपुत्र पुल वांद्रे-वरळी सी-लिंकपेक्षा 30 टक्के मोठा आहे.
- आसामची राजधानी दिसपुरपासून 540 किमी आणि अरूणाचलची राजधानी ईटानगरपासून 300 किमी लांब आहे.
- महत्त्वाचं म्हणजे चीनचं एरियल डिस्टंस 100 किमीपेक्षा कमी आहे.
- तेजपुर जवळ असलेल्या कलाईभोमोरा पुल नंतर ब्रम्हपुत्रवर पुढच्या 375 किमी ढोलापर्यंत दूसरा पुल नाही आहे.
- आत्तापर्यंत नदीच्या मार्गाने प्रवास करण्यासाठी होडीचा वापर करावा लागत होता.
- ब्रम्हपुत्र पुल बनवायचं काम 2011मध्ये सुरू झालं होतं, तर पुलासाठी एकुण 950 करोड खर्च झाला आहे.
- एकुण 182 खाबांवर हा पुल उभा आहे.
- आसाम आणि अरूणाचल या दोन राज्यांना हा पूल जोडेल.
- लोकांना प्रवास करण्यासाठी तसंच लष्कराला या पुलाचा खूप फायदा होणार आहे.
- चीन सीमेपर्यंत प्रवास करण्यासाठी चार तासांचं अंतर कमी होणार आहे.