"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 09:23 AM2024-10-05T09:23:18+5:302024-10-05T09:25:05+5:30
यासीन मलिक हा १९९० साली श्रीनगरच्या रावळपोरा भागात भारतीय हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे
काश्मीर - शस्त्राच्या बळावर विरोध करण्याचा त्याग करून मी गांधीवादी मार्ग स्वीकारला आहे. संयुक्त स्वतंत्र काश्मीरच्या उद्देशाने १९९४ साली मी सशस्त्र संघर्ष सोडला त्यानंतर आता गांधीवादी पद्धतीने मी विरोध करत आहे असं प्रतिज्ञापत्र जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष फुटिरतावादी नेते यासीन मलिकनं कोर्टात दिलं आहे. जेकेएलएफ वायवर बंदी आणण्याच्या निर्णयावरून कोर्टात मलिकने हा दावा केला आहे.
यूपीए कोर्टाद्वारे मागील महिन्यात जारी केलेल्या आदेशात यासीन मलिकच्या प्रतिज्ञापत्राचा उल्लेख आहे. गुरुवारी ४ ऑक्टोबरला हे प्रकाशित करण्यात आले. ज्यात जेकेएलएफ वाय या संघटनेला बेकायदेशीर कारवायावरील निर्बंध अधिनियम १९६७ अंतर्गत पुढील ५ वर्षासाठी बेकायदेशीर संघटना घोषित करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. TOI रिपोर्टनुसार, यासीन मलिने त्याच्या प्रतिज्ञापत्रात दावा केलाय की, फुटीरतावाद्यांनी उपस्थित केलेल्या काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी केंद्रातील राजकीय आणि सरकारी अधिकारी १९९४ पासून जोडले गेले आहेत असं त्याने सांगितले.
प्राथमिक शूटर म्हणून प्रसिद्धीझोतात
यासीन मलिक हा १९९० साली श्रीनगरच्या रावळपोरा भागात भारतीय हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणातील मुख्य गोळीबार करणारा आरोपी म्हणून त्याची ओळख पटली. यासीन मलिकला मे २०२२ मध्ये दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यादरम्यान त्याने दावा केला होता की ९० च्या दशकात विविध सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला चर्चेद्वारे हा वाद सोडवण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय जेव्हा तो एकतर्फी युद्धविराम सुरू करेल तेव्हा त्याच्या आणि JKLF-Y संघटनेतील सदस्यांवरील सर्व खटले मागे घेतले जातील.
यासीन मलिक काश्मीरच्या राजकारणात सक्रिय होता. तरुणांना भडकावण्यात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्यात त्याचा महत्त्वाचा हात मानला जातो. मलिक जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने JKLF वर बंदी घातली होती. यासीन मलिकनं १९९० मध्ये हवाई दलाच्या ४ जवानांची हत्या केल्याची कबुलीही दिली होती. मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.