अमेरिकन व्हिसासाठी करावी लागेल प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 11:18 AM2021-11-01T11:18:49+5:302021-11-01T11:19:11+5:30
८ नोव्हेंबरपासून भारतातील अंदाजे तीन दशलक्ष व्हिसाधारक लसीकरणाच्या पुराव्यासह नव्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास धोरणाअंतर्गत अमेरिकेत प्रवास करू शकतील, असेही दूतावासाने म्हटले.
नवी दिल्ली : काही कामांसाठी तात्पुरत्या स्वरूपात अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांना व्हिसासाठी (नॉन इमिग्रंट व्हिसा कॅटॅगरीज) अपॉईंटमेट मिळण्यास मोठी प्रतीक्षा करावी लागेल, असे अमेरिकेच्या येथील दूतावासाने म्हटले. या विलंबाचे कारण हे कोविड-१९ मुळे आलेले अडथळे होत. ८ नोव्हेंबरपासून भारतातील अंदाजे तीन दशलक्ष व्हिसाधारक लसीकरणाच्या पुराव्यासह नव्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास धोरणाअंतर्गत अमेरिकेत प्रवास करू शकतील, असेही दूतावासाने म्हटले.
“वैध मार्गांनी प्रवास करणाऱ्यांना मदत करणे हे उभय देशांतील द्विपक्षीय संबंध बळकट करून वाढवण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोविड-१९ मुळे जे अडथळे आले, त्यामुळे काही नॉन इमिग्रंट व्हिसा कॅटॅगरीजसाठी आमचा दूतावास आणि वकिलातीत जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असे दूतावासाने म्हटले. “अर्ज करणारे आणि आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठी आम्ही क्षमता वाढवण्याचे काम करीत होतो तेव्हा लोकांनी जो संयम दाखवला, त्याबद्दल दूतावास आभारी आहे.”
अपवादात्मक परिस्थितीत लागणार नाहीत पुरावे
लसीकरणाच्या गरजेबद्दल दूतावासाने म्हटले की, ८ नोव्हेंबरपासून अमेरिकेत येणाऱ्या विदेशी प्रवाशांसाठी कोविड-१९ चे पूर्ण लसीकरण अत्यावश्यक आहे. या प्रवाशांना अमेरिकेत येणाऱ्या विमानात प्रवेश करण्याच्या आधी लसीकरण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.
या पुराव्यासाठी मोजके अपवाद आहेत. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) ज्या लसी मान्य केल्या आहेत, त्यात एफडीएने प्राधिकृत केलेली तसेच डब्ल्यूएचओने इमर्जन्सी यूज लिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या लसी स्वीकारल्या जातील.
जागतिक आरोग्य संघटनेच्या इमर्जन्सी युज लिस्टमध्ये कोविशिल्डचा
समावेश असल्यामुळे अमेरिकेत प्रवेशासाठी ही लस स्वीकारली जाईल,
असे दूतावासाने म्हटले.