दहशतीचे वातावरण - केजरीवाल
By admin | Published: November 16, 2016 01:16 AM2016-11-16T01:16:45+5:302016-11-16T01:16:45+5:30
मोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे.
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
मोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे. अनेक विवाह स्थगित झाले आहेत, तर काही मोडले आहेत. मुलीच्या विवाह सोहळ्यात कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या जनार्दन रेड्डीच्या घरी मोदी सरकार सीबीआयला पाठवीत नाही. अडीच लाखांची रक्कम बँकेत जमा करणाऱ्या सामान्य माणसाच्या मात्र हात धुवून मागे लागले आहे, अशी जोरदार टीका करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्लीची विधानसभा बुधवारी दणाणून सोडली.
नोटबंदीचा वादग्रस्त निर्णय राष्ट्रपतींनी थांबवावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. केजरीवाल म्हणाले, एकीकडे धनाढ्य उद्योग घराण्यांचे १ लाख १४ हजार कोटींचे कर्ज वर्षभरात निर्लज्जपणे माफ करण्याचे औदार्य मोदी सरकारने दाखवले. जन धन खात्यात थोडीफार रोख रक्कम जमा करणाऱ्या गरीबांना धमकावण्याचा खेळ सुरू झाला आहे. पनामा पेपर्स लीकमधे मोदींच्या मित्रांची नावे आहेत, ही बाब आता लपून राहिलेली नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात पंतप्रधानांचा थेट नामोल्लेख झाला आहे, असे केजरीवाल म्हणाले. आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यालयात सीबीआयने धाड घातल्यानंतर २५ कोटींची बेहिशेबी रोकड सापडली तेव्हा अनेक गौप्यस्फोट झाले होते, असे सांगून केजरीवालांनी त्यात पंतप्रधानांचे नाव घेतले.