आई-वडिलांच्या वादामुळे चक्क हायकोर्टाने केलं बाळाचं नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 10:36 AM2018-05-10T10:36:07+5:302018-05-10T10:36:07+5:30
आई-वडिलांमधील वादामुळे चक्क कोर्टानेच बाळाचं नाव ठेवल्याचं समोर आलं आहे.
कोच्ची- बाळाचं नाव ठेवणं हे कुटुंबातील प्रत्येकाला आवडतं. अनेकदा बाळाचं नाव काय ठेवायचं यावरून बरीच चर्चा, विचार केले जातात. त्यानंतर बाळाचं नाव ठेवलं जातं. पण सगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का बसेल अशी ही घटना आहे. आई-वडिलांमधील वादामुळे चक्क कोर्टानेच बाळाचं नाव ठेवल्याचं समोर आलं आहे. केरळ हायकोर्टातील न्यायाधीशांना हा अनोखा निर्णय घ्यावा लागला. केरळ हायकोर्टातील न्यायाधीशांनी एका पाच वर्षीय मुलाचं नामकरण केलं आहे.
मुलाचं नाव ठेवण्यावरून वेगवेगळ्या धर्माचे असलेल्या त्या मुलाच्या आई-वडिलांमध्ये वाज झाला. हा वाद कोर्टातही गेला. शेवटी केरळ हायकोर्टाने मुलाचं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलाचे वडील हिंदू असल्यामुळे त्यांना बाळाचं नाव ‘अभिनव सचिन’ ठेवायचं होतं. तर आई ख्रिश्चन असल्यामुळे तिला ‘जॉन मनी सचिन’ असं मुलाचं नाव ठेवायचं होतं. या दोघांच्या वादामुळे न्या. ए.के. जयशंकरन नांबियार यांनी अखेरीस ‘जॉन सचिन’ या नाव निश्चित करून करून जन्म दाखला वितरीत करण्याचा आदेश दिला.
मुलाच्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. मुलाचं नामकरण करण्यावरून दोघांमध्ये एकमत न झाल्याने दोघांनीही वेगवेगळ्या नावाने जन्म दाखला देण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. ख्रिश्चन दिक्षा नामकरण प्रमाणपत्रावर मुलाचे नाव जॉन मनी सचिन लिहिण्यात आल्याचा दावा आईने केला होता. तर मुलगा २८ दिवसांचा असताना केलेल्या नामकरण विधीत मुलाचे नाव अभिनव सचिन ठेवल्याचा दावा वडिलांचा होता.
मुलाच्या आईने नावामधील 'मनी' हा शब्द काढण्याची परवानगी कोर्टाला दिली. पण मुलाचे वडील मात्र अभिनव नावावर ठाम होते. अखेरीस ज्या नावावर दोघंही सहमत होतील असं 'जॉन सचिन' हे मुलाचं नाव कोर्टाने ठेवण्याचा निर्णय घेतला. नामकरण करण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला आहे. जॉन हे आईकडील तर सचिन हे वडिलांचं पहिलं नाव आहे. त्यामुळे हे नाव स्वीकारावं, असं कोर्टाने म्हटलं.