“RSS शाखेत शिकण्यासारखे काही नाही, तिथे प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहतात”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:26 AM2021-10-20T11:26:00+5:302021-10-20T11:28:38+5:30
कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी एचडी कुमारस्वामी यांना RSS शाखेला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
विजयपुरा:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS आणि भाजपविरोधात अनेकविध मुद्द्यांवरून विरोधकांची टीका सातत्याने सुरू असल्याचे पाहायला मिळते. यातच कर्नाटकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (सेक्यूलर) नेते एचडी कुमारस्वामी यांना RSS शाखेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत शिकण्यासारखे काहीही नसते, तेथे प्रशिक्षण घेणारे लोक पुढे जाऊन विधानसभेत अधिवेशनादरम्यान, ब्ल्यू फिल्म्स पाहतात, अशी बोचकी टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.
मला त्यांच्या शाखेची गरज नाही. शाखेकडून जे काही शिकायचे आहे ते मी गरीबांच्या शाखेकडून शिकलो आहे. मला त्यांच्याकडून (आरएसएस शाखा) शिकण्यासारखे काही नाही, असा टोला कुमारस्वामी लगावला आहे. कर्नाटकमधील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी संघाच्या शाखेला निमंत्रण देण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना कुमार स्वामी यांनी संघावर जोरदार निशाणा साधला.
आरएसएसची सोबत नको आहे
मला आरएसएसची सोबत नको आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये काय शिकवले जाते हे आपण पाहिलं नाहीये का? विधानसभेत कसं वागावं, अधिवेशन सुरु असताना ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात. आरएसएसच्या शाखेत त्यांना (भाजपाला) हीच गोष्ट शिकवली जात नाही का? हे शिकवण्यासाठी मला तिथे (आरएसएस शाखेत) जाण्याची गरज आहे का, अशी विचारणा कुमारस्वामी यांनी केली.
दरम्यान, एचडी कुमारस्वामी यांनी २०१२ मधील एका घटनेचा संदर्भ दिला. भाजपाच्या तीन मंत्र्यांना अधिवेशनादरम्यान मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहताना पकडण्यात आले होते. या घटनेनंतर गदारोळ झाला होता. भाजप सरकारसमोरही मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार केंद्रात आणि कर्नाटकात भाजप सरकार काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.