Floor Test : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आज सिद्ध करणार बहुमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 11:36 IST2018-05-25T09:19:44+5:302018-05-25T11:36:29+5:30
देशभरातील डझनभर भाजपाविरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत सत्तेवर आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे.

Floor Test : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आज सिद्ध करणार बहुमत
बंगळुरू : देशभरातील डझनभर भाजपाविरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत सत्तेवर आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे. 222 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 104 व जेडीएस-काँग्रेस आघाडीचे 117 आमदार असल्याने कुमारस्वामी बहुमत सिद्ध करू शकतील, असे चित्र आहे.
विधानसभेचे कामकाज शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहे आणि दुपारी 2 वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. दरम्यान, काँग्रेस-जेडीएस आघाडीचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या या विधानामुळे कुमारस्वामी 5 वर्षं मुख्यमंत्री राहतील की नाही, याबाबत शंका उपस्थित झाली आहे. जी. परमेश्वर म्हणाले, कुमारस्वामी 5 वर्षं मुख्यमंत्री राहतील की या 5 वर्षांत आमचा कोणी मुख्यमंत्री होईल, याबाबत अद्याप निर्णय होणं बाकी आहे. जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार आज बहुमत सिद्ध करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
(बहुमत चाचणीआधीच काँग्रेसनं सैल केला मैत्रीचा हात; म्हणे, पक्की नाही 5 वर्षांची साथ)
काँग्रेस-जेडीएसचा वाढला ताण
बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ न गाठू शकल्यानं येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आमदारांची जुळवाजुळव न झाल्यानं बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी ही लढाई सोडलेली नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत, यादरम्यान, भाजपानं विधानसभा अध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार उतरवून कर्नाटक सरकारचा ताण वाढवला आहे. बहुमत सिद्ध करणं आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवड अशा दोन परीक्षांना काँग्रेस-जेडीएसला सामोरं जावं लागणार आहे. काँग्रेस-जेडीएसतर्फे के.आर.रमेश तर भाजपाकडून माजी कायदेमंत्री एस.सुरेश कुमार यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
I have no tension, I am going to win clearly: CM #HDKumaraswamy on today's floor test. #Karnatakapic.twitter.com/b6VgoKniUy
— ANI (@ANI) May 25, 2018