'गोमातेचा चारा खाल्ला, लोककल्याण काय करणार', अमित शाह यांची लालू प्रसाद यादवांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:24 IST2025-03-31T11:24:18+5:302025-03-31T11:24:51+5:30
Amit Shah criticizes Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यादव यांनी गोमातेचा चाराही खाल्ला. ते बिहारच्या लोककल्याणाचा विचार करू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

'गोमातेचा चारा खाल्ला, लोककल्याण काय करणार', अमित शाह यांची लालू प्रसाद यादवांवर टीका
- एस. पी. सिन्हा
गोपालगंज (बिहार) - लालूप्रसाद यादव यांनी गोमातेचा चाराही खाल्ला. ते बिहारच्या लोककल्याणाचा विचार करू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. बिहारला लालू-राबडीच्या जंगलराजकडे जायचे आहे की मोदी-नितीशकुमार यांच्या विकासाच्या रस्त्यावर जायचे आहे, याचा निर्णय घ्यायचा आहे, असेही गोपालगंज येथील जाहीर सभेत ते म्हणाले. जे काम काँग्रेस ६५ वर्षात करू शकली नाही ते काम मोदी सरकारने १० वर्षात केले. लालू प्रसाद यादव यांनी तर गोमातेचा चाराही खाल्ला, अशी टीका त्यांनी केली.
अमित शाह म्हणाले की, राजद आणि काँग्रेसने बिहारचे नुकसान केले. लालूंनी मुलगी, पत्नी, भाऊ, मेहुण्याला राजकारणात स्थिर केले. परंतु बिहारच्या युवकांसाठी काहीही केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या युवकांना रोजगार दिला. आता पुन्हा एनडीएचे सरकार आल्यास पाच वर्षात बिहारला पूर-मुक्त करण्यात येईल. त्यामुळे बिहारच्या जनतेने मोदी-नितीशकुमार यांचे सरकार आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
बिहारने देशाला नेहमीच मार्ग दाखवला
• देशाचे स्वातंत्र्याचे आंदोलन असो की जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन असो, नेहमी या भूमीने देशाला रस्ता दाखवण्याचे काम केले आहे. आपण अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारण्याचे स्वप्न पाहिले. परंतु, लालू आणि त्यांच्या साथीदारांनी त्यात आडकाठी आणली.
● पंतप्रधानांनी ५५० वर्षांनी २ रामलल्लाला भव्य मंदिरात विराजमान केले. बिहारमध्ये माता सीतेचे भव्य मंदिर होईल, असे शाह म्हणाले.