त्याने तिच्यासाठी धर्म बदलला अन् तिने लग्नानंतर नांदायलाच दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 06:29 AM2018-08-29T06:29:40+5:302018-08-29T06:30:02+5:30
तीन वर्षांचे प्रेमप्रकरण; पालकांसह राहण्याची केली इच्छा व्यक्त
नवी दिल्ली : त्या दोघांचे प्रेम होते. तिच्याशी विवाह करण्यासाठी तो हिंदू झाला. पण विवाहानंतर तिचे पालक तिला घरी घेऊन गेले. पालकांपासून तिला सोडवण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तिने आपल्याला पतीसोबत नव्हे, तर पालकांसह राहण्याची इच्छा असल्याचे न्यायालयात सांगितले आणि त्याची साथ सोडली. ही घटना आहे
छत्तीसगढमधील. तेथील २३ वर्षांच्या अंजली जैनने ३३ वर्षांच्या मोहम्मद इब्राहिम सिद्दिकी याच्याशी विवाह केला. त्याने लग्न करण्यासाठी इस्लाम सोडून तो हिंदू झाला. विवाहानंतर अंजलीच्या पालकांनी तिला सासरी राहू नये, असे सांगितले आणि तिला घरी आणले. ती सज्ञान असून तिच्याशी आपला विवाह झाल्याने तिला पालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी तरुणाने छत्तीसगढ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हिंदू धर्म स्वीकारून आर्यन आर्य हे नाव धारण केलेल्या तरुणाने आमचे तीन वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते, आम्ही २५ फेब्रुवारी २0१८ रोजी रायपूरच्या आर्य समाज मंदिरात विवाह केला होता, त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी त्याने धर्मांतर केले होते.
न्यायालयाने दिली अनुमती
हे प्रकरण सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आले. तेव्हा मात्र अंजलीने आपला जबाब बदलला. आपण पालकांसमवेत राहू इच्छितो, असे अंजलीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ती सज्ञान असल्याने आणि तिची इच्छा लक्षात घेत, न्यायालयाने तिला पालकांसह राहण्यास अनुमती दिली आहे.