कर्तव्यनिष्ठेला सलाम..."मला १५०० जवानांची काळजी घ्यायचीय, कुटुंब तू सांभाळ!"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 08:02 AM2020-05-04T08:02:31+5:302020-05-04T11:06:01+5:30
काश्मीरच्या हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल आशुतोष शर्मा यांना वीरमरण
श्रीनगर: आमचं कुटुंब आशुतोष यांना कायम त्यांच्या धैर्यासाठी लक्षात ठेवेल, अशी भावना काश्मीरच्या हंदवाडामधील चकमकीत शहीद झालेले कर्नल आशुतोष शर्मांच्या पत्नीनं व्यक्त केली. आशुतोष यांचं त्यांच्या गणवेशावर प्रेम होतं. त्यांनी कायमच त्यांच्या युनिटला प्राधान्य दिलं. त्यांच्या जाण्यानं माझं खूप मोठं नुकसान झालं. ते कधीही भरुन येणार नाही. स्वत:च्या सहकाऱ्यांच्या, देशाच्या नागरिकांच्या संरक्षणसाठी माझ्या पतीनं केलेल्या कार्याचा मला सार्थ अभिमान आहे, असं शर्मा यांच्या पत्नी पल्लवी आशुतोष म्हणाल्या. काल हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना शर्मा यांच्यासह एक मेजर आणि दोन जवान शहीद झाले.
आशुतोष यांनी कायम त्यांच्या युनिटला प्राधान्य दिलं. त्यांच्या युनिटमधील सहकाऱ्यांची तंदुरुस्ती, त्यांना मिळणारं जेवण याबद्दल ते कायम सजग होते. एक अधिकारी म्हणून त्यांनी कायम त्यांच्या सहकाऱ्यांची काळजी घेतली, अशा शब्दांत पल्लवी यांनी पतीच्या आठवणींना उजाळा दिला. मी दहशतवाद्यांना कंठस्नान घालेन आणि घरी परत येईन, असं ते कायम म्हणायचे. होय, ते परत येत आहेत. पण तिरंग्यात लपेटून येत आहेत, अशा हृदयद्रावक भावना त्यांनी व्यक्त केली.
काही महिन्यांपूर्वीच एका वृत्तवाहिनीनं करवाचौथच्या दिवशी आपली मुलाखत घेतल्याचं पल्लवी यांनी सांगितलं. 'त्यावेळी कर्नल आशुतोष शर्मा कर्तव्य बजावत होते. मी त्यांच्यासाठी करवाचौथचा उपवास केला होता. त्यावेळी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे घरी आले होते. आज पुन्हा वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे आमच्या घरी आले आहेत. मात्र तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा फरक आहे,' असं पल्लवी म्हणाल्या.
मी घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळेन, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्यांच्या अनुपस्थितीत मी कुटुंबाची काळजी घेईन, याबद्दल ते कायम निश्चिंत असायचे. मला दीड हजार सहकाऱ्यांची काळजी घ्यायची आहे. तू कुटुंबाची नीट काळजी घेशील याची मला खात्री आहे, असं त्यांनी मला अनेकदा म्हटलं होतं, असं पल्लवी यांनी सांगितलं. २७ फेब्रुवारीला काश्मीरच्या उधमपूरमध्ये सेना पदक वितरण सोहळ्यात पल्लवी आणि आशुतोष यांची अखेरची भेट झाली. मात्र ही भेट केवळ दोन दिवसांची होती.