‘मला रस्त्यावर पाहून त्याला आनंद होतो’, गौतम सिंघानिया-नवाज मोदी वादात विजयपत सिंघानियांची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:32 PM2023-11-24T14:32:36+5:302023-11-24T14:37:36+5:30
Vijaypat Singhania: रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आता विजयपत सिंघानिया यांचीही एंट्री झाली आहे.
रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आता विजयपत सिंघानिया यांचीही एंट्री झाली आहे. तसेच त्यांनी मुलगा गौतम सिंघानिया यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रेमंडला एका छोट्याश्या कंपनीमधून ग्लोबल ब्रँडपर्यंत मजल मारून देणारे विजयपत सिंघानिया म्हणाले की, मला रस्त्यावर आलेलं पाहून गौतमला आनंद होतो.
विजययपत सिंघानिया यांनी २०१५ मध्ये पुत्र गौतम सिंघानिया यांच्याकडे रेमंड समुहाचं नेतृत्व सोपवलं होतं. या निर्णयाबाबत विजयपथ सिंघानिया म्हणाले की, मी माझ्या मुलाकडे सर्व काही सोपवून मुर्खपणा केला. गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यामध्ये घटस्फोटावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केलं आहे.
विजयपत सिंघानिया पुढे म्हणाले की, मुलाकडे सर्वकाही सोपवणं ही माझी मोठी चूक होती. जे आई-वडील त्यांच्या मुलांना सर्व काही देतात त्यांनी सावधपणे विचार केला पाहिजे. सध्या पत्नीसोबतच्या वादामुळे चर्चेत असलेले उद्योगपती गौतम सिंघानिया सन २०१७ मध्ये वडील विजयपत सिंघानिया यांना दक्षिण मुंबईतील रेमंड हाऊस या निवासस्थानातून बाहेर काढल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी या घरात आयोजित करण्याता आलेल्या दिवाळी पार्टीमध्ये नवाज यांना प्रवेश मिळाला नव्हता. त्यावरून मोठा वादही झाला होता. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून पत्नीसोबतचं ३२ वर्षांचं नातं संपुष्टात आणल्याची घोषणा केली होती.