महिला कुस्तीपटूंशी त्यांनी अनेकदा गैरवर्तन केले; आंतरराष्ट्रीय पंच जगबीरसिंग यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 05:37 AM2023-06-10T05:37:25+5:302023-06-10T05:37:45+5:30
ब्रिजभूषण सिंह यांच्या गैरवर्तनाची काही उदाहरणेही जगबीरसिंग यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०१३ पासून ब्रिजभूषण सिंह यांनी अनेक वेळा महिला कुस्तीपटूंसोबत गैरवर्तन केले असून, त्याचे आपण साक्षीदार आहोत, असा दावा आंतरराष्ट्रीय पंच जगबीरसिंग यांनी गुरुवारी केला. सिंह यांच्या गैरवर्तनाची काही उदाहरणेही त्यांनी दिली.
मी २००७ पासून आंतरराष्ट्रीय पंच आहे. आंदोलक कुस्तीपटूंचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. मी ब्रिजभूषण यांनाही दीर्घकाळापासून ओळखतो. मुलींनी तक्रार करेपर्यंत मी जास्त काही बोलू शकत नव्हतो; पण मी या घटना माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आणि मला वाईट वाटले. मी अनेक वेळा ब्रिजभूषण यांना महिला कुस्तीपटूंसोबत गैरवर्तन करताना पाहिले आहे, असेही ते म्हणाले. सिंह यांनी हे आरोप नाकारले असल्याबाबत विचारले असता ‘एखादा चोर आपण चोरी केल्याचे सांगतो काय?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
कुस्तीपटूंविरुद्ध गुन्हा नाही
कुस्तीपटूंनी द्वेषपूर्ण भाषण केलेले नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही, असे दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील एका कोर्टात सांगितले. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी अनामिका यांच्यासमोर दाखल केलेल्या कृती अहवालात पोलिसांनी ही बाब नमूद केली आहे. सिंह यांच्याविरुद्ध खोटे आरोप केल्याबद्दल कुस्तीपटूंविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर या न्यायालयात सुनावणी सुरू होती.
‘तो’ घटनाक्रम पुन्हा
- ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्धच्या लैंगिक छळ प्रकरणाच्या चौकशीला वेग देत दिल्ली पोलिसांनी कथित गुन्ह्याशी संबंधित घटनाक्रम पुन्हा उभा करण्यासाठी शुक्रवारी एका महिला कुस्तीपटूला कुस्ती महासंघाच्या कार्यालयात नेले.
- ब्रिजभूषण यांच्या शासकीय निवासस्थानातच हे कार्यालय आहे. चौकशीचा एक भाग म्हणून पोलिसांनी दुपारी दीडच्या सुमारास एका महिला कुस्तीपटूला कुस्ती महासंघाच्या कार्यालयात नेले. कुस्तीपटूसोबत एक महिला पोलिसही होती. ते तेथे जवळपास अर्धा तास थांबले. महिला पोलिसाने कुस्तीपटूला घटनाक्रम पुन्हा उभा करण्यास व जेथे छळ झाला होता ती ठिकाणे आठवण्यास सांगितले.
ही ब्रिजभूषणची ताकद आहे. तो आपली राजकीय ताकद वापरून आणि खोट्यानाट्या गोष्टी पसरवून महिला कुस्तीपटूंना त्रास देत असून, त्याची अटक आवश्यक आहे. पोलिसांनी आम्हाला तोडण्याऐवजी त्याला अटक केली तरच न्याय मिळण्याची आशा आहे, अन्यथा नाही. - विनेश फोगाट, कुस्तीपटू