संघाच्या ‘सेवा भारती’ला ‘त्यांनी’ दिले ५ लाख; खालिदा बेगम यांनी दिली बचतीची रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:41 AM2020-03-31T02:41:56+5:302020-03-31T06:27:08+5:30
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘सेवा भारती’ या संघटनेने लॉकडाऊनमध्ये केलेल्या कल्याणकारी कामाने प्रभावित होऊन खालिदा बेगम ...
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘सेवा भारती’ या संघटनेने लॉकडाऊनमध्ये केलेल्या कल्याणकारी कामाने प्रभावित होऊन खालिदा बेगम (८७) यांनी बचत केलेले पाच लाख रुपये संघटनेला देणगी म्हणून दिले आहेत.
खालिदा बेगम या जम्मू आणि काश्मीरच्या असून, त्यांनी हे पाच लाख रुपये हज यात्रेसाठी राखून ठेवले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना हज यात्रा लांबणीवर टाकावी लागली आहे. सेवा भारतीने जम्मू आणि काश्मीरमध्ये या दिवसांत केलेल्या कामामुळे खालिदा बेगम जी या प्रभावीत झाल्या व त्यांनी संघटनेला पाच लाख रुपये देणगी देण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रसारमाध्यम शाखा इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्राचे प्रमुख अरुण आनंद यांनी म्हटले.
काश्मीरमधील गरजू लोकांसाठी सेवा भारतीने हे पैसे वापरावेत, अशी खालिदा बेगम यांची इच्छा आहे, असे सांगून आनंद म्हणाले की, ‘‘जम्मू आणि काश्मीरमध्ये इंग्रजी माध्यमात ज्या मोजक्या लोकांनी शिक्षण घेतले त्यात खालिदा बेगम आहेत. जनसंघाचे कधी काळी अध्यक्ष राहिलेले कर्नल पीर मोहम्मद खान यांच्या खालिदा बेगम या सून आहेत.’’
त्या काश्मीरमध्ये वंचित वर्गांत कल्याणकारी कार्यात सक्रिय आहेत. त्यांचे चिरंजीव फारुक खान हे पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेले असून, सध्या ते जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नरांचे सल्लागार आहेत, असे अरुण आनंद म्हणाले.