एका पायावर तीन किलोमीटर धावत त्यांनी टाळला मोठा रेल्वे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 02:35 PM2018-10-29T14:35:58+5:302018-10-29T14:36:18+5:30
आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवणे सर्वांनाच जमतंच असं नाही. पण एका गृहस्थांनी एक पाय अधू असतानाही तीन किलोमीटर धावत मोठा रेल्वे अपघात टाळला.
उडुपी - आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवणे सर्वांनाच जमतंच असं नाही.मात्र उडुपी येथील कृष्णा पुजारी यांनी एक पाय अधू असतानाही तब्बल तीन किलोमीटर धावत तुटलेल्या रेल्वे रुळांची माहिती अधिकाऱ्यांना देऊन मोठा रेल्वे अपघात टाळला.
कोरंगपाडी येथील रहिवासी असलेल्या 53 वर्षीय कृष्णा पूजारी यांचा डावा पाय काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अधू झाला होता. त्यामुळे त्यांना नीट चालता येत नाही. पायाचे दुखणे कमी व्हावे म्हणून त्यांना डॉक्टरांनी दररोज सकाळी नियमित चालण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, शनिवारी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांनी वाटेत रेल्वे ट्रॅकच्या रुळाला तडे गेल्याचे पाहिले. आता काय करावं याचा विचार ते करत असतानाच अचानक एक ट्रेन त्या रुळांवरून धडधडत गेली. त्यामुळे रूळ तुटला.
या आणीबाणीच्या वेळी कृष्णा यांनी प्रसंगावधान दाखवत रेल्वे कार्यालयाच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली. अधू पायानिशी सुमारे तीन किलोमीटर धावत त्यांनी रेल्वे रूळ तुटल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन रेल्वे गाड्यांना तातडीने थांबण्याची सूचना दिली. एक रेल्वे घटनास्थळापासून सात किमी अंतरावर तर दुसरी गाडी 16 किमी अंतरावर थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला.