अंत्यसंस्कारच्या दुसऱ्याच दिवशी तो घरी परतला, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 08:46 AM2020-08-10T08:46:29+5:302020-08-10T08:47:21+5:30
कोरोना महामारीमुळे रुग्णालयातून प्रेतांची अदलाबदल झाल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे, कुटुंबीयांना अनेकदा त्रासही सहन करावा लागला आहे.
कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक व्यक्ती अंत्यसंस्काराच्या दुसऱ्यादिवशीच घरी पोहोचला. त्यामुळे, कुटुंबासहीत नातेवाईक व मित्रपरिवारही गोंधळात पडले होते. अहमद हसन असे या व्यक्तीचे नाव असून 2 ऑगस्ट रोजी घरातील सदस्यांशी भांडण झाल्यानंतर ते घरातून निघून गेले होते. मात्र, तीन दिवस उलटल्यानंतरही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
कोरोना महामारीमुळे रुग्णालयातून प्रेतांची अदलाबदल झाल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे, कुटुंबीयांना अनेकदा त्रासही सहन करावा लागला आहे. तर, आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर दु:खात असलेल्या नातेवाईकांना अचानक आश्चर्य वाटावं अशाही घटना घडल्याचं पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात घरातून निघून गेलेल्या अहमद यांच्या बाबतीतही अशीच घटना घडली. कुटुंबातील सदस्यांशी भांडण झाल्यामुळे अहमद हे घरातून निघून गेले होते. याबाबत, कुटुंबीयांना पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी पोलिसांना एक मृत व्यक्ती आढळून आली. त्यामुळे, अहमद यांच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला असता, ते प्रेत अहमदचेच असल्याची ओळख पटविण्यात आली.
संबंधित मृत व्यक्ती ओळख पटविल्यानंतर, अहमदच्या कुटुंबीयांनी त्या मृतदेहावर 5 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कारही केले. मात्र, 6 ऑगस्ट रोजी अहमद जिवंत घरी परतला. त्यामुळे, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावेळी, मी तीन दिवस एका कंपनीत काम केले. पण, चौथ्या दिवशी काम न मिळाल्यामुळे मला अस्वस्थता जाणवली. मला भिती वाटायला लागल, त्यामुळे मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मी घरी परतल्याचे अहमद यांनी सांगितले. अहमद यांच्या घरी परल्यामुळे कुटुंबीयांना आश्चर्य आणि आनंदही झालाय.
दरम्यान, याप्रकरणी कानपूर एसएसपी डॉ. प्रीतिंदर सिंह यांनी सांगितले की, या घटनेनं आम्हीही आश्चर्यचकित झालो आहोत. कारण, ज्या व्यक्तीचा दफनविधी करण्यात आला ती व्यक्ती कोण आहे, हा तपास सुरु आहे. त्यासाठी, आम्ही पोस्टर्स चिकटवले आहेत. कुटुंबीयांच्या चुकीच्या ओळख परेडमुळे हा गोंधळ झाल्याचे सिंह यांनी म्हटले.