ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:58 PM2024-03-04T13:58:51+5:302024-03-04T13:59:11+5:30
Lok Sabha Election 2024: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी कुटुंबावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्याला आता स्वत: मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी कुटुंबावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्याला आता स्वत: मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदी म्हणाले की, माझ्या कुटुंबावरून मला लक्ष्य केले गेले. मात्र आता संपूर्ण देशच मी मोदींचं कुटुंब आहे, असं म्हणत आहे. परिवारवादी पक्षाचे चेहरे वेगवेगळे असले तरी त्यांचं चरित्र एकच असतं. दोन निश्चित गोष्टी आहेत. त्या म्हणजे यांच्या चरित्रामध्ये एक खोटेपणा आणि दुसरं लूट, असा टोलाही मोदींनी लगावला.
तेलंगाणामध्ये सभेला संबोधित करताना, नरेंद्र मोदी म्हणाले की, १४० कोटी देशवासीय माझं कुटुंब आहेत. आज देशातील कोट्यवधी माता-भगिनी-मुली हेच मोदीचं कुटुंब आहे. जेशातील प्रत्येक गरीब हा माझं कुटुंब आहे. ज्यांचं कुणी नाही ते मोदींचे आहेत. मोदी त्यांचा आहे. माझा भारत माझं कुटुंब आहे. याच भावनेचा विस्तार घेऊन मी स्वप्नांना संकल्पासह सिद्धीस नेण्यासाठी तुमच्यासाठी जगत आहे. तुमच्यासाठी झगडत आहे आणि तुमच्यासाठीच लढत राहीन.
काल पाटणामध्ये इंडिया आघाडीच्या सभेमध्ये लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले होते. त्यांनी मोदींचं कुटुंब नसण्यावरून टीका केली होती. त्याला आज मोदींनी तेलंगाणामधून उत्तर दिलं आहे. भ्रष्टाचार. परिवारवाद आणि तुष्टीकरणामध्ये गुंतलेले इंडिया आघाडीचे नेते चिडचिड करत आहेत. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा खरा जाहीरनामा समोर आणला आहे. मी यांच्या घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित करतो म्हणून त्यांनी आता माझं कुटुंबच नाही, असं म्हणण्यास सुरुवात केली आहे.