...त्याने बोगस तिकीटासोबत 10 दिवस दिल्ली विमानतळावरच केलं वास्तव्य
By admin | Published: June 2, 2016 12:11 PM2016-06-02T12:11:53+5:302016-06-02T12:11:53+5:30
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने बोगस तिकीटासोबत एक, दोन नाही तर तब्बल दहा दिवस वास्तव्य केल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 02 - महत्वांच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने बोगस तिकीटासोबत एक, दोन नाही तर तब्बल दहा दिवस वास्तव्य केल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर काही दिवसांपुर्वी गुडगावमधील मोहम्मद अब्दुल्लाह 10 दिवस विमानतळावर ठाण मांडून होते. मात्र विमानतळ कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना साधी याची खबरही लागली नाही.
मोहम्मद अब्दुल्लाह यांनी 11 जानेवारीला संयुक्त अरब अमिरातीसाठी एतिहादच्या बोगस तिकीटावर विमानतळामध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर पुढचे 10 दिवस त्यांनी टर्मिनलमध्येच घर केलं होतं. हाऊसकिपिंगमधील कर्मचा-याच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्याने सीआयएसएफला यबाबत माहिती दिली. 20 जानेवारीला त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.
मोहम्मद अब्दुल्लाह हैद्राबादचे रहिवासी असून गुडगावमधील कंपनीत काम करत असल्याचा दावा केला आहे. 'ही एक दुर्मिळ घटना आहे. कोणत्याही विमानतळावर घडलेली ही पहिली घटना आहे. अब्दुलाह यांना एकदा हटकलं होतं पण त्यांनी पुन्हा आतमध्ये प्रवेश मिळवला होता', अशी माहिती सीआयएसएफच्या अधिका-यांनी दिली आहे.
11 जानेवारीला जेव्हा मोहम्मद अब्दुल्लाहने एतिहादच्या तिकीटावर प्रवेश मिळवला होता, तेव्हा तिकीट बोगस असल्याचं लक्षात आल्यानंतर सीआयएसएफकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं. अब्दुल्लाहने एका तासात तिकीटाची पुन्हा एकदा प्रिंट आऊट काढून दुस-या गेटने विमानतळात प्रवेश मिळवला. 10 दिवस वास्तव्य केल्यानंतर हाऊसकिपिंगमधील कर्मचा-याने सांगितल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर कारवाई करत सुरक्षा रक्षकांनी मोहम्मद अब्दुल्लाहला ताब्यात घेतलं. तसंच गुप्तचर यंत्रणेलाही या घटनेची माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी घुसखोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घुसखोरी होणे चिंतेचा विषय ठरु लागला आहे. एका वर्षात 24 जणांहून अधिक जणांना अनधिकृतपणे प्रवेश केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. 2015 मध्ये 50 जणांना बोगस तिकीटासहित अटक केली होती तर यावर्षी आतापर्यंत 20 प्रकरणं समोर आली आहेत.