मोदी सरकारमधील "या" मंत्र्यासोबत झाले होते कुलभूषण जाधव यांचे शिक्षण
By admin | Published: April 12, 2017 04:17 PM2017-04-12T16:17:57+5:302017-04-12T16:17:57+5:30
पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांचे सैनिकी शिक्षण मोदी सरकारमधील एका मंत्र्यासोबत झाल्याचे समोर आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.12 - पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या जीवनाबाबत नवनवी माहिती आता समोर येत आहे. कुलभूषण जाधव यांचे सैनिकी शिक्षण मोदी सरकारमधील एका मंत्र्यासोबत झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 30 वर्षांपूर्वी कुलभूषण जाधव आणि सध्या केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले राज्यवर्धन सिंग राठोड हे राष्ट्रीय डिफेंस अकादमीमध्ये एकाच वर्गात शिकत होते. भारताचे माजी नौसैनिक असलेल्या जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.
30 वर्षांपूर्वी एडीएच्या 77 व्या वर्गात राज्यवर्धन सिंग राठोड आणि कुलभूषण जाधव एकाच वर्गात शिक्षण घेत होते. येथे एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर राज्यवर्धन सिंग राठोड लष्करी सेवेत दाखल झाले. तर कुलभूषण जाधव यांनी नौदलात काम करण्यास सुरुवात केली. मात्र या दोघांनीही सैनिकी सेवेतील आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवृत्ती स्वीकारली होती. राज्यवर्धन सिंग राठोड यांनी 2004 साली अथेन्स ऑलिम्पिकमध्ये देशाला रौप्यपदक जिंकून दिले. तर कुलभूषण जाधव इराणमधील चाबहार येथे व्यवसाय सुरू करण्यासाठी गेले.
दरम्यानच्या काळात गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये हिंसक कारवाया आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्कराने जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून अटक केली. तसेच लष्करी न्यायालयात खटला चालवून जाधव यांमा मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला भारत सरकारने विरोध केला आहे. पण आपल्याला रॉकडून पाकिस्तानमध्ये हिंसक कारवाया आणि हेरगिरीसाठी पाठवण्यात आल्याचे जाधव यांनी दंडाधिकारी आणि न्यायालयासमोर मान्य केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.