मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:32 PM2024-10-10T21:32:35+5:302024-10-10T21:34:57+5:30

Court News: दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेला तरुण पिता होऊ शकणार आहे.

He will become a father four years after his death, the High Court gave an important decision  | मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 

मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 

दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेला तरुण पिता होऊ शकणार आहे. चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या या तरुणाच्या वीर्याचे रुग्णालयात सुरक्षित ठेवलेले नमुने त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवावेत, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने सर गंगाराम रुग्णालयाला दिले आहेत.

चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या या तरुणाच्या आई-वडिलांनी रुग्णालयात सुरक्षित ठेवलेले आपल्या मुलाच्या वीर्याचे नमुने मिळावेत, अशी विनंती रुग्णालयाकडे केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्याला नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुलाच्या वीर्याचे नमुने मिळावेत यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने वरील आदेश दिले. तसेच सध्याच्या भारतीय कायद्यानुसार वीर्य देणाऱ्या दात्याची परवानगी असेल तर त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या वीर्यापासून प्रजननासाठी कुठलीही बंदी नाही आहे, असे स्पष्ट केले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एका आई-वडिलांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले होते की, त्यांच्या ३० वर्षांच्या मुलाला कर्करोगाचं निदान झाल्याने उपचारासाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर केमोथेरपीमुळे पुढे पिता बनण्यात अडचणी येऊ शकतात, असे डॉक्टरांनी त्याला सांगितले होते. त्यानंतर त्याने आपले वीर्य सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर काही महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आपल्या दिवंगत मुलाचा वंश पुढे नेण्यासाठी त्याच्या वीर्याचे नमुने देण्याची मागणी रुग्णालयाकडे केली होती‌. मात्र रुग्णालयाने त्यास नकार दिला होता. 
आता सदर तरुणाच्या वीर्याचे नमुने त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्याचे आदेश देताना सांगितले की, जर मरणारी व्यक्ती विवाहित असती, त्याची कुणी जोडीदार असती तर प्रकरण वेगळं असतं. अशा परिस्थितीत विद्यमान कायद्यानुसार मृत्यूनंतर प्रजननावर कुठलीही बंदी नाही आहे.

Web Title: He will become a father four years after his death, the High Court gave an important decision 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.