मुख्याध्यापकांनी शाळेत सुरू केलं कुक्कुटपालन
By admin | Published: June 15, 2017 01:52 PM2017-06-15T13:52:11+5:302017-06-15T14:41:50+5:30
विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावं या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शाळेत सुट्टीच्या काळात कुक्कुटपालन होत असल्याची घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रामपूर, दि. 15- विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावं या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शाळेत सुट्टीच्या काळात कुक्कुटपालन होत असल्याची घटना समोर आली आहे. दर्शनपूरमधील प्राथमिक शाळेत उन्हाळी सुट्टीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी रिकाम्या वर्गामध्ये कुक्कुटपालन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर त्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती कळल्याचं तिकडच्या मुलभूत शिक्षण अधिकारी सर्वा नंद यांनी सांगितलं आहे. २१ मे पासून शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक फर्याद अली खान यांनी शाळेतील शिक्षक प्रयाग कुमार यांना घेऊन वर्गांमध्ये पोल्ट्री फार्म सुरू केल्याचं समजत आहे. इतकंच नव्हे तर शाळेच्या परिसरात इतर ग्रामस्थांचे पशुपक्षीही आढळून आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी शिव सहाय अवस्थी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार गावातील महिला सरपंचाच्या पतीच्या सहमतीने केला, असं या प्रकरणातील दोषी शिक्षक प्रयाग कुमार यांनी सांगितलं आहे. "उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यानंतर आम्ही शाळेला कुलूप लावून चाव्या ग्रामपंचांकडे दिल्या होत्या, जे स्वतः या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. शिक्षक म्हणून माझी ही पहिलीच पोस्टिंग असल्याने करिअरमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाईलाजाने मुख्याध्यापकांच्या या कामात सहभागी झालो होतो, अशी माहिती शिक्षक प्रयाग कुमार यांनी द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे.
हा संपूर्ण प्रकार शिक्षण विभागासाठी लाजीरवाणा आहे, असं जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यापुढे असा कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असंही जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाला जिल्ह्यातील सगळ्या शाळेच्या इमारती आणि परिसराची पाहणी करण्याचे आणि दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.