मणिपूरमध्ये दादरी, गाईचे वासरु चोरल्याच्या संशयातून मुख्याध्यापकाची हत्या
By Admin | Published: November 6, 2015 01:35 PM2015-11-06T13:35:47+5:302015-11-06T13:41:13+5:30
दादरीतील घटना ताजी असतानाच मणिपूरमध्येही गाईचे वासरु चोरल्याच्या संशयावरुन मदरशातील मुख्याध्यापकाची हत्या करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. ६ - दादरी येथे गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन वृद्धाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मणिपूर येथे गाईचे वासरु चोरल्याच्या संशयावरुन मदरशात मुख्याध्यापक म्हणून काम करणा-या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद हसमद अली असे या मुख्याध्यापकाचे नाव असून अली यांच्या मुलाने मात्र या वादामागे शेजारच्यांसोबतचा वाद कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पूर्व इंफाळमधील केराओ मकतिंग गावात राहणारे मोहम्मद अली यांचा मृतदेह आढळला असून अत्यंत निर्घृणपणे अली यांची हत्या करण्यात आली होती. गायीचे वासरु चोरल्याच्या संशयातून ही हत्या झाल्याचा दावा सुरुवातीला केला जात होता. दादरीतील घटनेप्रमाणे अली यांची हत्या झाल्याचा आरोप करत मणिपूरमधील मुस्लिम संघटनांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली गेली होती. मात्र आता याप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
शेजारी राहणा-या मोहम्मद अमू व त्यांच्या कुटुंबासोबत आमचा जागेवरुन वाद सुरु होता. माझ्या वडिलांची सुनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आली व नंतर हत्येचे खापर दुस-या समाजातील व्यक्तींवर फोडण्यात आले असा दावा अली यांचा मोठा मुलगा रियाझने केला आहे. आमचे महिन्याचे उत्पन्न दीड लाखांच्या घरात आहे, मग माझे वडिल गायीचे वासरु का चोरतील असा सवालही त्याने उपस्थित केला. मणिपूरमध्ये मुस्लिम व अन्य धर्मींयांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते व मारेक-यांनी याचाच फायदा घेतला असे अलीचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.