CoronaVaccine News: होळीपूर्वीच येईल कोरोना लस, आरोग्यमंत्र्यांना पूर्ण विश्वास; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 04:57 PM2020-11-19T16:57:26+5:302020-11-19T17:00:53+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कोतुक करताना हर्षवर्धन म्हणाले, गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - मला विश्वास आहे, कोरोनावरील लस पुढील तीन ते चार महिन्यांत तयार होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी फिक्की एफएलओच्या एक वेबिनारला संबोधित करत होते. यावेळी, 135 कोटी भारतीयांना ही लस पुरविण्याचा प्राधान्य क्रम वैज्ञानिक मूल्यांकनावर निर्धारित केला जाईल, असेही ते म्हणाले.
हर्षवर्धन म्हणाले, 'मला विश्वास आहे, की पुढील तीन चार महिन्यांतच कोरोना लस तयार होईल. मात्र, लसीचे प्राधान्य वैज्ञानिक डेटाच्या आधारावरच निर्धारित करण्यात येईल. आरोग्य कर्मचारी तसेच कोरोना वॉरियर्सना स्वाभाविकपणे प्राधान्य दिले जाईल. यानंतर वृद्ध तसेच आजारी लोकांना लस टोचली जाईल. लसिकरणासंदर्भात मोठी योजना तयार केली जात आहे. याच्या ब्लूप्रिंटवर चर्चा करण्यासाठी एक ई व्हॅक्सीन इंटॅलिजेन्स प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आशा आहे, की 2021 हे आपल्या सर्वांसाठी एक चांगले वर्ष ठरेल.
राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर; आता मास्क न वापरणाऱ्यांना द्यावा लागणार 2 हजार रुपये दंड
सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कोतुक करताना हर्षवर्धन म्हणाले, गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू, हा पंतप्रधान मोदींचा एक फारच चांगला प्रयोग होता. यात जनतेची राष्ट्रव्यापी भागीदारी होती. लॉकडाउन आणि अनलॉक लागू करणे, हे केंद्र सरकारच्या काही धाडसी निर्णयांपैकीच महत्वाचे निर्णय होते. आपण फार चांगले काम केले आहे.
या लढाईत सरकार अत्यंत सक्रीय होते
हर्षवर्धन म्हणाले, या लढाईत सरकार अत्यंत सक्रीय होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानतळं, बंदरं आणि जमिनी सीमांवर लक्ष ठेवण्यात आले. गेल्या 11 महिन्यातील कामांचा पाढा वाचताना, हर्षवर्धन म्हणाले, अत्यंत कमी वेळात कोरोना महामारीच्या प्रकोपाला नियंत्रित करणाऱ्या काही मोजक्या देशांत भारतही आहे. सुरुवातीच्या काळात आपल्याला पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आणि एन 95 मास्कची कमी भासली. मात्र, काही महिन्यातच आपण या गोष्टी जगातील काही देशांना निर्यात करण्यात सक्षम झालो.