सर्व नागरिकांना मोफत मिळणार नाही कोरोना लस?; आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या 'त्या' ट्विटनं वाढला संभ्रम
By कुणाल गवाणकर | Published: January 2, 2021 01:37 PM2021-01-02T13:37:46+5:302021-01-02T13:40:49+5:30
आधी म्हणाले सर्वांना कोरोना लस मोफत; मग म्हणतात ३ कोटी जणांना मिळेल मोफत लस
नवी दिल्ली: कोरोनावरील लस दिल्लीतच नव्हे, तर देशातही मोफत मिळेल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. मात्र अवघ्या तासाभरानंतर त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे संभ्रम वाढला आहे. त्यामुळे कोरोना लस मोफत मिळणार की त्यासाठी पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना कोरोनावरील लसीच्या शुल्काबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांनी केवळ दिल्लीच नाही, तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, असं सांगितलं. आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे कोरोनावरील लसीकरणाबाबत विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला. मात्र यानंतर अवघ्या तासाभरात हर्षवर्धन यांनी केलेल्या ट्विटनं सगळ्यांनाच संभ्रमात टाकलं.
#WATCH | Not just in Delhi, it will be free across the country: Union Health Minister Dr Harsh Vardhan on being asked if COVID-19 vaccine will be provided free of cost pic.twitter.com/xuN7gmiF8S
— ANI (@ANI) January 2, 2021
'पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्राधान्य असलेल्या ३ कोटी जणांना कोरोना लस मोफत देण्यात येईल. त्यामध्ये १ कोटी आरोग्य कर्मचारी आणि २ कोटी फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा समावेश असेल,' असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. पैकी ३ कोटी लोकांना मोफत दिली जाईल. तर उर्वरित २७ कोटी जणांना जुलैपर्यंत लस दिली जाईल. या लाभार्थ्यांचं लसीकरण कसं करायचं याचा तपशील निश्चित करण्यात येईल, असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
In 1st phase of #COVID19Vaccination free #vaccine shall be provided across the nation to most prioritised beneficiaries that incl 1 crore healthcare & 2 crore frontline workers
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) January 2, 2021
Details of how further 27 cr priority beneficiaries are to be vaccinated until July are being finalised pic.twitter.com/K7NrzGrgk3
हर्षवर्धन यांच्या ट्विटमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिल्या टप्प्यातल्या २७ कोटी जणांना लस मोफत मिळणार की नाही. त्यानंतर उर्वरित १०० कोटी भारतीयांना कोरोना लस मोफत मिळणार की त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार, असे काही महत्त्वाचे प्रश्न हर्षवर्धन यांच्या ट्विटमुळे उपस्थित झाले आहेत.