कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट'बाबत आरोग्यमंत्र्यांची तज्ज्ञांसोबत बैठक, 'या' विशेष सूचना दिल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:24 PM2022-04-12T14:24:19+5:302022-04-12T15:38:05+5:30
corona :या बैठकीनंतर मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट ' संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आज कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट' संदर्भात देशातील वरिष्ठ तज्ज्ञांसोबत बैठक झाली. तसेच, कोरोनाच्या प्रकरणांचाही आढावा घेतला आणि कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स आणि प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेली देखरेख आणि पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरातील लोकांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच भारत सरकारही या नवीन व्हेरिएंटबाबत सतर्क दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतातही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर सर्व खबरदारीच्या उपायांवर चर्चेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईनंतर भारतात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE चा आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये आढळून आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.
कोरोना व्हायरसचा हा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते. तसेच, ओमायक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरिएंटपेक्षा XE व्हेरिएंट 10 टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे दिसून येते, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भाग म्हणून XE म्यूटेशनला ट्रॅक केले जात आहे. ओमायक्रॉनच्या लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी, त्वचेची जळजळ यांचा समावेश आहे.