CoronaVirus News : "उत्तर भारतीय विद्यार्थी राज्यात कोरोना पसरवताहेत"; तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:01 PM2022-06-01T17:01:11+5:302022-06-01T17:10:16+5:30
CoronaVirus News : तामिळनाडूमध्ये मंगळवारी कोरोनाचे 98 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 34 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून रुग्णांची संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,745 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,636 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून विविध उपाय करण्यात येत आहेत. याच दरम्यान तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी एक अजब विधान केलं आहे.
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर तामिळनाडूमध्ये कोरोना पसरवल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यम यांनी उत्तर भारतीय विद्यार्थी तामिळनाडूमध्ये कोरोना व्हायरस पसरवत आहेत असं म्हटलं आहे. "काही उत्तर भारतीय राज्यांमध्ये कोविड-19 ची प्रकरणे अजूनही वाढत आहेत. या ठिकाणांहून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे राज्यात संसर्ग वाढला आहे" असं देखील सांगितलं. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Tamil Nadu | North Indian students are spreading Covid-19 in Tamil Nadu. Students from Kelambakkam VIT College and Sathyasai college have got affected by Covid in hostels and classes. In some North Indian states, Covid cases are still increasing: State Health Min Ma Subramanian pic.twitter.com/ekATYHgMaM
— ANI (@ANI) June 1, 2022
केलमबक्कम व्हीआयटी कॉलेज आणि सत्य साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला असून तो राज्यासाठी चिंतेचा विषय असल्याचं देखील म्हटलं आहे. तामिळनाडूमध्ये मंगळवारी कोरोनाचे 98 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 34 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 38,025 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही राज्यांमध्ये पुन्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.