महाराष्ट्राला कोरोना लसीचे २.२० कोटी डोस उपलब्ध करून द्या; राजेश टोपेंची केंद्राला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:46 PM2021-03-16T22:46:44+5:302021-03-16T22:48:54+5:30
corona vaccine - देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, याला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. तर, दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचा (corona vaccine) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. यातच राज्यासाठी दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्यावेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. (health minister rajesh tope demanding 20 lakh corona vaccine dose for maharashtra for every week)
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) मंगळवारी दिल्लीला गेले होते. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोना आणि लसीकरणाबाबत चर्चा केली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राजेश टोपे यांनी यावेळी केली.
शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात अर्धा तास खलबतं; 'या' ५ मुद्यांवर झाली चर्चा!
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींची आवश्यकता
राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी यांच्यासह ६० वर्षांवरील आणि ४५ वयोगटावरील सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्वांना पहिला डोस मे महिन्यापर्यंत तर दुसरा डोस जूनपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी २.२० कोटी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या डोसची आवश्यकता आहे, असे टोपे यांनी सांगितले.
दर आठवड्याला २० लाख कोरोना लसीचे डोस
राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख कोरोना लसींचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.
लसीकरण केंद्र उभारण्याची परनवागी द्यावी
राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ३६७ खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. कोरोना लसीकरणानंतर आढळून येणाऱ्या दुष्परिणामांची संख्या किरकोळ असून, लसीकरण केंद्रासाठी १०० खाटांचे रुग्णालय असावे. या निकषातून सवलत देऊन ५० बेड असलेल्या रुग्णालयांमध्येही केंद्र सुरू करावे. यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल, असे टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली. मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.