आरोग्यमंत्री म्हणाले, ‘गेट आऊट’
By admin | Published: November 29, 2015 12:50 AM2015-11-29T00:50:11+5:302015-11-29T00:50:11+5:30
हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी फतेहाबाद येथे आयोजित बैठकीदरम्यान वादावादीनंतर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक संगीता कालिया यांना ‘गेट आऊट’असे फर्मान सोडले.
चंदीगड : हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी फतेहाबाद येथे आयोजित बैठकीदरम्यान वादावादीनंतर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक संगीता कालिया यांना ‘गेट आऊट’असे फर्मान सोडले. परंतु कालिया यांनी त्यांचा हा आदेश सपशेल धुडकावून ‘जाणार नाही’
असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर
शनिवारी तडकाफडकी या
महिला पोलीस अधीक्षकाची
बदली करण्यात आल्याने प्रचंड वादळ निर्माण झाले असून विरोधी पक्ष आणि सोशल मीडियावर लोकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी.एल. पुनिया यांनी मंत्र्यास बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा तक्रार निवारण व जनसंपर्क समितीच्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्याने आदेशाचे पालन न केल्याने संतापलेले मंत्रिमहोदय बैठकीतून निघून गेले होते. या दोघांमधील वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान २०१० च्या तुकडीतील महिला आयपीएस अधिकारी आणि इतर दोन अधिकाऱ्यांची राज्य सरकारने बदली केली असल्याचे एका अधिकृत वक्तव्यात सांगण्यात आले. कालिया यांना मानेसरच्या चतुर्थ आयआरबी कमांडंट पदावर नियुक्त करण्यात आले असून विकास धनकड यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शनिवारी करनाल येथे पत्रकारांशी बोलताना आपण या प्रकरणाची दखल घेतली असून ते योग्य पद्धतीने हाताळण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
अमली पदार्थ आणि दारुतस्कर सक्रिय असल्याबाबत तक्रारी मिळत होत्या. बैठकीतही एका स्वयंसेवी संघटनेने याबाबत तक्रार केली. परंतु कालिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरच बरसल्या आणि तुम्ही मंत्र्यांकडे का तक्रार करीत आहात? असा सवाल त्यांना केला. यावरून त्यांचा असहकार स्पष्ट होत होता, असे स्पष्टीकरण वीज यांनी दिले आहे.
महिला अधिकाऱ्याने सरकारच अवैध दारू विक्रीत सामील असल्याचे सांगून सरकारवरच खापर फोडल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या महिन्यात १९९८ च्या तुकडीतील महिला आयपीएस अधिकारी भारती अरोडा यांनी संयुक्त पोलीस आयुक्त (वाहतूक)या पदावर बदली करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
नेमके काय घडले!
तक्रार निवारण समितीच्या या बैठकीत आरोग्यमंत्री अनिल वीज यांच्याशिवाय महिला पोलीस अधिक्षक संगीता कालिया व इतर काही अधिकारी उपस्थित होते. चर्चेदरम्यान वीज यांनी पंजाबमधील सीमा भागात सुरू असलेल्या मद्य तस्करीकडे लक्ष वेधून पोलीस काय करीत आहेत? असा सवाल केला.
उत्तर देताना कालिया यांनी आम्ही कारवाई करीत असून आतापर्यंत अडीच हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचे सांगितले. मात्र वीज यांनी पोलीस कुठलीही कारवाई करीत नसून याला कालिया जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांनी कालियांना बाहेर जाण्यास सांगितले. परंतु कालिया यांनी बैठकीतून बाहेर जाण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतापलेले वीज स्वत:च बाहेर पडले.