भारतात मंकीपॉक्सचा धोका? आरोग्यमंत्री जेपी नड्डांची बैठक; दिले महत्त्वाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:24 PM2024-08-17T22:24:19+5:302024-08-17T22:25:58+5:30
अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आल्यानंतर त्याबाबतची दहशत वाढली आहे. धोका लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत आढावा बैठक घेतली.
Monkeypox: कोरोनानंतर मंकीपॉक्स हा आजार जागतिक चिंता बनली आहे. या आजारामुळे आता पुन्हा मोठ्या साथीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केलं आहे. अनेक देशात मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शनिवारी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंकीपॉक्सची परिस्थिती आणि देशाच्या तयारीची माहिती घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शनिवारी मंकीपॉक्सच्या परिस्थितीचा आणि तयारीचा आढावा घेतला. बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आतापर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मंकीपॉक्सबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मंकीपॉक्सचे प्रकरण उघडकीस आल्यास तपास व उपचारासाठी तत्काळ उपाययोजना केल्या जातील असं बैठकीत ठरवण्यात आलं आहे.
सर्व विमानतळ, बंदरे आणि सीमा प्रवेशांवर आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, संपूर्ण खबरदारी घेण्यासाठी चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, कोणतेही प्रकरण आढळल्यास त्यांना वेगळे करणे आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य सुविधा तयार करणे यासारख्या उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत मंकीपॉक्सचा संसर्ग सामान्यतः २-४ आठवडे टिकतो आणि रुग्ण सहसा बरे होतात. संक्रमित व्यक्तीशी दीर्घकाळापर्यंत जवळचा संपर्क, सहसा लैंगिक संपर्काद्वारे, शरीराच्या किंवा जखमेच्या द्रवांशी थेट संपर्क किंवा संक्रमित व्यक्तीचे दूषित कपडे किंवा बेडशीट वापरणे यामुळे याची लागण होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, जागतिक आरोग्य संघटना, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, आरोग्य सेवा महासंचालनालय, केंद्र सरकारची रुग्णालये, इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यासह सर्व तज्ज्ञ उपस्थित होते.
दरम्यान, मंकीपॉक्स विषाणूमुळे फ्लूसारखी लक्षणे आणि पू भरलेले फोड येतात. जरी ते सामान्य असले तरी, कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांसाठी, लहान मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी ते घातक ठरू शकतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे अशा लोकांसाठी हा आजार धोकादायक आहे.