आरोग्य मंत्रालयाने मागविला चिकुनगुनियाचा अहवाल
By Admin | Published: September 15, 2016 02:58 AM2016-09-15T02:58:13+5:302016-09-15T02:58:13+5:30
राजधानी दिल्लीत चिकुनगुनियाने दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बुधवारी या प्रकरणी दिल्ली सरकारकडून विस्तृत अहवाल मागविला आहे
नितीन अग्रवाल , नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत चिकुनगुनियाने दहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बुधवारी या प्रकरणी दिल्ली सरकारकडून विस्तृत अहवाल मागविला आहे, तर केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दाखविली आहे. दिल्लीत चिकुनगुनियाने कहर केला असून, आतापर्यंत एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
दिल्लीसह देशातील अनेक भागांतील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या आजाराची माहिती घेण्यासाठी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. येथे पत्रकारांशी बोलताना नड्डा म्हणाले की, आम्ही दिल्ली सरकारकडून चिकुनगुनियाच्या मृत्यूप्रकरणी अहवाल मागितला आहे.
तथापि, एक असाही मतप्रवाह आहे की, हे मृत्यू चिकुनगुनियाने होत नाहीत किंवा चिकुनगुनिया मृत्यूचे कारण बनत नाही. तरीही आम्ही दिल्ली सरकारकडून अहवाल मागविला आहे. नड्डा म्हणाले की, आपण याबाबत दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
चिकुनगुनियातील गुंतागुंतीने मृत्यू
डासांपासून होणाऱ्या चिकुनगुनियाने दिल्लीत आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. एका खासगी रुग्णालयात गाजियाबादच्या ८० वर्षीय वृद्धाचा या रोगाने मृत्यू झाला. गाजियाबादच्याच आणखी एका रुग्ण महेंद्र सिंह यांचा मंगळवारी अपोलो हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोमवारी तीन वृद्धांचा चिकुनगुनियाने मृत्यू झाला, तर इशा या २२ वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला होता. एम्समध्येही एका व्यक्तीचा चिकुनगुनियाने मृत्यू झाल्याचे वृत्त
चिकुनगुनियाने सात बळी गेल्यानंतर दिल्ली सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, हे मृत्यू चिकुनगुनियाने झालेले नाहीत. पण, मीडिया तसे दाखवत आहे. वस्तुत: हा रोग घातक नाही. दिल्लीत रोज २०० लोकांचा मृत्यू होतो. पण, याबाबत कोणी विचारत नाही, असेही ते म्हणाले. नायब राज्यपालांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे व्टिटही जैन यांनी केले आहे.
नेते दिल्लीच्या बाहेर
नायब राज्यपाल नजीब जंग हे ३ सप्टेबर रोजी अमेरिकेतील मुलीला भेटण्यासाठी गेलेले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बंगळुरुत आहेत. मनीष सिसोदिया फिनलँडला गेलेले आहेत. तर इम्रान हुसेन हे हज यात्रेसाठी गेलेले आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन हे गोव्याला गेले होते ते दिल्लीत दाखल झाले आहेत. गोपाल राय हे छत्तीसगढमध्ये आहेत.