Coronavirus : देशात दर 2 तासाला एकाचा मृत्यू, 24 तासांत आढळले 328 नवे रुग्ण - आरोग्यमंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 10:27 PM2020-04-02T22:27:17+5:302020-04-02T22:36:12+5:30
आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.
नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 328 नवे कोरोनाग्रस्त आढून आले आहेत. तर दर दोन तासाला एकाचा मृत्यू होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्रालयचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.
1 दिवसात मरणारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक -
अग्रवाल म्हणाले, गेल्या 24 तासांत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 50 वैद्यकीय कर्मचारी आहेत. यात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
तलबीगी जमातशी संबंधित 400 जण कोरोना संक्रमित -
कोरोनासंदर्भातील लढाई सुरूच आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. सर्व धर्माच्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करायला हवे. राज्य सरकारांनीही लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करायला हवी. मुंबईतील धारावीमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू झ्याल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच देशभरात तबलिगी जमातशी संबंधित 400 लोक कोरोना संक्रमित आहेत. तर 1804 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रकारच्या सूचना दिल्या. यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाईन ट्रेनिंगपासून ते रिटायर्ड डॉक्टरांची मदत मागण्यासंदर्भात अनेक मुद्द होते. तसेच कोरोनासंदर्भात रुग्णालयांसंदर्भातही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे लव अग्रवाल म्हणाले.
पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा -
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्याम पंतप्रधान मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करून घ्या, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, याचीही काळजी राज्यांनी घ्यावी. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करावे. क्वारंटाईन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशा सूचना यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या.