सीआरपीएफ हुतात्म्यांच्या कुटुंबियांना आरोग्य संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:21 AM2020-03-16T04:21:58+5:302020-03-16T04:22:48+5:30
सीआरपीएफ हे देशातील सगळ्यात मोठे निमलष्करी दल असून, त्यात वेगवेगळ्या दर्जाचे ३.२५ लाख कर्मचारी आहेत.
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) स्थापना झाल्यापासून कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या त्याच्या सुमारे २,२०० जणांच्या कुटुंबातील सदस्यांना पूर्ण आरोग्य संरक्षण (हेल्थ कव्हर) देऊन त्याचा पूर्ण हप्ताही सीआरपीएफ देणार आहे.
सीआरपीएफ हे देशातील सगळ्यात मोठे निमलष्करी दल असून, त्यात वेगवेगळ्या दर्जाचे ३.२५ लाख कर्मचारी आहेत. १९ मार्च रोजी सीआरपीएफचा ८१ वा वर्धापन दिन असून, त्यानिमित्त ‘प्राऊड आॅफ अवर मार्टर्स, वुई सेलेब्रेट देअर व्हॅलोर’ अशी ही कल्पना आहे. या कल्पनेंतर्गतच आरोग्य संरक्षण आणि इतर उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. ‘आम्ही आमच्या सर्व हुतात्म्यांच्या कुटुंबियांना आरोग्य संरक्षण देण्याचा व त्यासाठीचा पूर्ण हप्ताही देण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांसाठीचे हप्तेही कल्याण निधीतून दिले जातील,’ असे सीआरपीएफचे महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी सांगितले. या योजनेचा २,२०० हुतात्म्यांच्या कुटुंबांना लाभ होईल. जवान किंवा कॉन्स्टेबल हे सगळ्यात खालचे पद असून, त्याचा आयुष्यभरासाठीचा हप्ता ३० हजार रुपये आहे, तर अधिकारीपदासाठीचा हप्ता १.२० लाख रुपये आहे.