आरोग्य कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला घातला हार; व्हायरल झाला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:21 AM2021-06-22T11:21:15+5:302021-06-22T11:22:52+5:30
मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावरील प्रकार
सतना: देशात कालपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला सुरुवात झाली. मध्य प्रदेशानं दिल्ली, उत्तर प्रदेशाला मागे टाकत सर्वाधिक लसीकरण केलं. मध्य प्रदेशात काल १६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लस टोचली गेली. राज्यानं दिवसभरात १० लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र दुपारी २ पर्यंतच तब्बल ७ लाख लोकांचं लसीकरण झालं होतं. मात्र राज्यातल्या सतनामध्ये लसीकरण अभियानादरम्यान एक अजब प्रकार घडला.
सतनामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला हार घातला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कालपासून मध्य प्रदेशात लसीकरणासाठी महाअभियान सुरू झालं आहे. सतना जिल्ह्यातही लसीकरण महाअभियानाचा प्रारंभ झाला. मात्र या दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांकडून एक चूक झाली. महाअभियानाची सुरुवात करताना महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर त्यांच्या शेजारीच असलेल्या मोदींच्या फोटोलादेखील हार घालण्यात आला.
सतना नगरच्या शासकीय विद्यालयात हा संपूर्ण प्रकार घडला. या ठिकाणी लसीकरण केंद्र तयार करण्यात आलं आहे. लसीकरण अभियानाची सुरुवात करताना महात्मा गांधींच्या फोटोसोबतच पंतप्रधान मोदींच्या फोटोलाही पुष्पहार घालण्यात आला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाच्या भरात भलतीच चूक केली आहे. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.