नापास विद्यार्थ्यांसमोर विद्यापीठाने टेकले हात!
By admin | Published: June 24, 2016 12:13 AM2016-06-24T00:13:10+5:302016-06-24T00:13:10+5:30
कोणी एक-दोन वेळा परीक्षेत नापास होऊ शकतो. मात्र, त्यानंतर तो पासच होतो. तथापि, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ८२ विद्यार्थ्यांची ‘बात’च वेगळी आहे
अहमदाबाद : कोणी एक-दोन वेळा परीक्षेत नापास होऊ शकतो. मात्र, त्यानंतर तो पासच होतो. तथापि, गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ८२ विद्यार्थ्यांची ‘बात’च वेगळी आहे. त्यांनी परीक्षेत पास व्हायचे नाही, अशी जणू शपथच घेतली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने परीक्षा देत असूनही अभियांत्रिकी पदवी परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. यातील काहींची १२ वेळा, तर काहींची १५ वेळा परीक्षा देऊन झाली आहे.
त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी विद्यापीठाने नाही नाही ते प्रयत्न केले. वेबसाइटवर अपेक्षित प्रश्नसंच अपलोड केला. अगदी त्यांना नकला (कॉपी) करण्याचीही मुभा दिली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. सर्व उपाय करून थकल्यानंतर विद्यापीठाने आता याचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले आहे. या वेळी तुम्ही नापास झालात, तर पुढच्या वेळी परीक्षा देता येणार नाही. तुम्हाला पुन्हा नव्या सत्राला प्रवेश घ्यावा लागेल, अशी तंबीच विद्यापीठाने या स्टार परफॉर्मर विद्यार्थ्यांना दिली आहे.
या स्टार परफॉर्मर विद्यार्थ्यांची परीक्षा वारी विद्यापीठ परिसरात चेष्टेचा विषय बनली आहे. विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘२००७ मध्ये स्थापन झालेले हे विद्यापीठ स्वत:च परीक्षा घेते. या ८२ स्टार परफॉर्मर
विद्यार्थ्यांना सोडून आतापर्यंत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नोकरीही करीत आहेत. विद्यापीठ या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करण्यास आतूर आहे. मात्र, हे विद्यार्थी जागचे हलायला तयार नाहीत. आम्ही काय करू शकतो.’
या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरू आहे. यातील काही जणच परीक्षा देत असून, उर्वरित गैरहजर आहेत. परीक्षा तीन तासांची असताना हे विद्यार्थी एक ते दीड तासातच परीक्षा हॉलमधून बाहेर येतात. (वृत्तसंस्था)