याचिकांची सुनावणी मद्रास हायकोर्टातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:55 AM2018-06-28T04:55:27+5:302018-06-28T04:55:29+5:30
विधानसभा अध्यक्षांनी अण्णा द्रमुकच्या ज्या १८ आमदारांना अपात्र ठरविले आहे, त्यांच्या याचिकेची सुनावणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. सत्यनारायणन यांच्यासमोर होईल
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांनी अण्णा द्रमुकच्या ज्या १८ आमदारांना अपात्र ठरविले आहे, त्यांच्या याचिकेची सुनावणी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. सत्यनारायणन यांच्यासमोर होईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या अरुण मिश्रा व न्या. एस. के. कौल यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बुधवारी दिला आहे.
या १८ आमदारांनी अण्णा द्रमुकचे नेते टी. टी. व्ही. दिनकरन यांची पाठराखण करुन तामिळनाडूतील आपल्याच पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पक्षांतरबंदी कायद्यान्वये विधानसभाध्यक्ष पी. धनपाल यांनी त्यांना गेल्या वर्षी १८ सप्टेंबरला अपात्र ठरविले होते. या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका मद्रास उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्यात, यासाठी त्यातील काही आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात
धाव घेतली होती.
पक्षांतरविरोधी कायद्यान्वये विधानसभेतील अण्णा द्रमुकच्या १८ आमदारांना अपात्र ठरविणे योग्य होते का, या मुद्द्यावर मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या दोन न्यायाधीशांनी परस्परविरोधी निकाल दिले होते. त्यामुळे गोंधळही
निर्माण झाला होता. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनंतर सर्वात ज्येष्ठ असलेले न्यायाधीश
एम. सत्यनारायणन यांच्यासमोर सुनावणी होईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊन हा प्रश्न तूर्तास तरी मिटविला आहे.
या १८ आमदारांना विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरविल्यामुळे तेथील पलानीस्वामी सरकार टिकले आहे. त्या पक्षाकडे आता कसेबसे बहुमत शिल्लक आहे. मात्र, हे आमदार पात्र ठरल्यास पलानीस्वामी सरकार अल्पमतात जाईल आणि प्रसंगी पलानीस्वामी यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मद्रास उच्च न्यायालय आता काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.