अयोध्याप्रकरणी याचिकांवर 4 जानेवारीला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 08:18 AM2018-12-25T08:18:45+5:302018-12-25T08:19:04+5:30
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.
नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 4 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की भाजपाला या प्रकरणावर रोज सुनावणी हवी आहे, जेणेकरून निकाल लवकर लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 30 सप्टेंबर 2010 मध्ये 2.77 एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात 14 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने 9 मे 2011 मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.
राम मंदिरासाठी सरकारवर वाढता दबाव
लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राम मंदिरासाठी पुन्हा मागणी जोर पकडू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटना ठिकठिकाणी बैठका, सभा घेत असल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढत आहे. संघानेही राम मंदिरासाठी वेगळा कायदा आणण्याची मागणी केली आहे.