Ayodhya Case: हिंदू पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण, लवकर निर्णय येण्याची शक्यता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 11:34 AM2019-08-31T11:34:16+5:302019-08-31T11:40:26+5:30
Ram Mandir Case: देशात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरलेल्या अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यामध्ये हिंदू पक्षकारांची सुनावणी पूर्ण झाली आहे.
नवी दिल्ली - देशात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरलेल्या अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यामध्ये हिंदू पक्षकारांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा नोव्हेंबर महिन्यामध्ये निकाल येण्याची शक्यता वाढली आहे. अयोध्येतील या 2.77 एकर जागेच्या मालकी हक्कावरून गेल्या 70 वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. आता सोमवारपासून मुस्लिम पक्षकार आपली बाजू मांडणार आहेत.
अयोध्येतील वादग्रस्त जमिनी प्रकरणी 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर 25 दिवसांमध्ये हिंदू पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा लवकरच अंतिम निकाल लागण्याची शक्यता वाढली आहे.
यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या खटल्यावर निकाल देताना एकूण वादग्रस्त जमिनीपैकी दोन तृतियांश जमीन हिंदू पक्षकारांना दिली होती. दरम्यान, नियमित सुनावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, डी.वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने अत्यंत कमी वेळात रामलल्ला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय रामजन्मभूमी पुनर्निर्माण समिती, हिंदू महासभेचे दोन गट शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंह विशारद यांचे कायदेशीर उत्तराधिकारी यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. यादरम्यान वकिलांनी आपापला वेगवेगळा तर्क मांडावा आणि इतरांच्या वक्तव्यांची पुनरावृत्ती करू नये, असे सांगितले.
या आठवड्यातही या खटल्याची सलग पाच दिवस सुनावणी झाली. ज्यामध्ये कामकाज झटपट आटोपले. मात्र सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी युक्तिवादास पुरेसा वेळ मिळणार नाही असे सांगत नियमित सुनावणीस विरोध केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले होते.