राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी २० जुलैला; नेमके काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:38 AM2022-07-18T05:38:38+5:302022-07-18T05:39:53+5:30
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार असून, न्यायाधीश कृष्णा मुरारी व आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपशी हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आता बुधवार, २० जुलै रोजी सुनावणी होईल.
या आधी ११ जुलैला कोर्टाने यावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होईल. त्यांच्यासोबत न्यायाधीश कृष्णा मुरारी व आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचे आव्हान, शिंदेंना सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान, अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात याचिका, एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान, या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.
जोपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार शिवसेना पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. उद्धव ठाकरे यांनी ठरवून दिलेल्या प्रतोद व्यक्तीने दिलेले आदेशसुद्धा पाळण्याचे संविधानिक बंधन बंडखोर आमदारांवर आहे. - अॅड. असीम सरोदे