लोकायुक्त वादावर १९ ला सुनावणी
By admin | Published: January 5, 2016 12:31 AM2016-01-05T00:31:35+5:302016-01-05T00:31:35+5:30
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश वीरेंद्रसिंग यांची उत्तर प्रदेशचे लोकायुक्तपदी नियुक्ती करण्याला आव्हान देणाऱ्या विविध याचिका
नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश वीरेंद्रसिंग यांची उत्तर प्रदेशचे लोकायुक्तपदी नियुक्ती करण्याला आव्हान देणाऱ्या विविध याचिका आधीच्याच खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी घेतला आहे. या प्रकरणी आता १९ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
यापूर्वी न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने लोकायुक्त नियुक्तीसंबंधी याचिकांवर सुनावणी केली असून नव्या याचिकाही त्यांच्याकडेच सोपविण्यात याव्या, असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेशसिंग, विरोधी पक्षनेते तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीला उत्तर प्रदेशला लोकायुक्त देण्यात अपयश आल्याची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी १६ डिसेंबर रोजी वीरेंद्रसिंग यांच्या नियुक्तीचा आदेश दिला होता. समाजवादी पार्टी सरकारने न्या. वीरेंद्रसिंग यांच्या नियुक्तीसंबंधी तथ्य दडवून ठेवताना सर्वोच्च न्यायालयाची फसवणूक केल्याचा आरोप सचिदानंद गुप्ता यांनी एका याचिकेत केला आहे. त्यांच्या याचिकेवर अवकाशकाळात विशेष खंडपीठाने सुनावणी केली होती. वकील प्रशांत भूषण आणि कामिनी जयस्वाल यांनी गुप्ता यांची बाजू मांडली. (लोकमत न्यूज नेटवर्क)