वैद्यकीय, दंतसंबंधित दोन याचिकांवर सोमवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 02:13 AM2019-06-08T02:13:12+5:302019-06-08T02:13:20+5:30
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच या प्रवेशाबाबत चार जून रोजी दिलेल्या आदेशांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी केलेल्या या याचिकांवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने शुक्रवारी दाखवली
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये वैद्यकीय आणि दंतच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाशी संबंधित विषयावरील दोन ताज्या याचिकांवर १० जून रोजी सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेण्यास राजी झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच या प्रवेशाबाबत चार जून रोजी दिलेल्या आदेशांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी केलेल्या या याचिकांवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने शुक्रवारी दाखवली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात असे म्हटले होते की, २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात वैद्यकीय आणि दंतच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत आणखी कोणतीही याचिका कोणत्याही न्यायालयात विचारात घेतली जाणार नाही. या आदेशात दोनपैकी एका अर्जदाराने दुरुस्ती करण्याची मागणी याचिकेत केली आहे. पाच मार्च, २०१९ रोजी अर्ज करताना विद्यार्थ्याने ज्या जागेला प्राधान्य दिले होते त्या जागेत बदल करण्यास कोणत्याही विद्यार्थ्याला परवानगी देऊ नये, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते. महाराष्ट्र राज्याच्या वतीने बाजू मांडताना वकिलाने या दोन अर्जांना विरोध करताना चार जून रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, वैद्यकीय व दंतच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत प्रवेशाशी संबंधित कोणत्याही अर्जाचा चालू शैक्षणिक वर्षात न्यायालयात विचार होणार नाही, असे स्पष्ट केले होते.