सत्तासंघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला; दोन्ही बाजूंच्या वकिलांशी चर्चा करुन निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:29 AM2022-11-02T06:29:54+5:302022-11-02T06:30:01+5:30
सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुरू असलेल्या प्रकरणांची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होईल. सुप्रीम कोर्टाचे न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली.
या प्रकरणी आता प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मतदारांच्या वतीने घटनात्मक नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करीत याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने वकील असीम सरोदे व ज्येष्ठ विधिज्ञ अशोककुमार गुप्ता यांनी मतदारांच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकण्याची विनंती घटनापीठाने मान्य केली.
सध्याच्या स्थितीमुळे जनतेच्या मनात अस्वस्थता असून, सर्वच राजकीय पक्ष ‘घटनात्मक नैतिकता’ टिकविण्यात अपयशी ठरले आहेत. अनेक नेत्यांनी घटनात्मक नैतिकतेचे उल्लंघन केल्याचे या सर्व घटनाक्रमात उघड झाले आहे. नेत्यांना राज्यघटनेबद्दल आता काही आस्था आहे, असे वाटत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
याचिकाकर्त्याने ऐतिहासिक केशवानंद भारती निकालाचा दाखला यावेळी दिला. ‘घटनात्मक परंपरांचे उल्लंघन हे घटनात्मक नैतिकेतेचा भंग’ असल्याचे मत केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना कोर्टाने नोंदविले होते. घटनापीठाने यासंदर्भातील बाजू लिखित स्वरूपात मांडण्याची सूचना केली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सहमतीने चर्चा करून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लिखित स्वरूपात द्यावेत, अशी सूचना घटनापीठाने केली. यासाठी घटनापीठाने चार आठवड्यांचा वेळ दिला.